मनमाड : धावत्या रेल्वे गाडीत हजारोंवर चाकरमानी आणि प्रवाशांसोबत दररोज मनमाडहून निघून ५२० किलोमीटरचा प्रवास करणारा गणपती म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या मनमाड -कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमधील ‘गोदावरीचा राजा’ गणेश मंडळाच्या मूर्तीची रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या खास बोगीत प्रती गोदावरी एक्स्प्रेसमध्ये स्थापना करण्यात आली. या वर्षी गणपतीचा प्रवासही वाढला आहे. कारण आठवड्यातून तीन दिवस ही रेल्वे धुळ्याहून सुटते. त्यामुळे त्या काळात गणेशाला दैनंदिन ६४० किलोमीटर प्रवास घडणार आहे. मूर्तीची स्थापना करण्यासाठी मंडळाने महिन्यापूर्वीच रीतसर परवानगी मागितली. पण रेल्वे प्रशासनाकडून कोणतेच उत्तर येत नव्हते. अखेर गणेश भक्तांच्या रेट्यापुढे प्रशासनाला नमते घ्यावे लागले. स्वतंत्र बोगीत जल्लोषात श्रींची स्थापना झाली. गोदावरी एक्स्प्रेस अर्थात गोदावरीचा राजा गणेश मंडळाचे यंदाचे २७ वे वर्ष आहे. रेल्वे प्रशासनाने सध्या प्रती गोदावरी म्हणून मनमाड-दादर एक्स्प्रेस सुरू केली आहे. सध्या मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातून सुटणारी प्रती गोदावरी एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस धुळे -दादर उर्वरित दिवस मनमाड -दादर अशी करण्यात आली आहे. हेही वाचा >>> जळगाव : गणेशाचे जल्लोषात स्वागत, बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल त्यामुळे या गाडीला पासधारकांसाठी बोगी नाही. मंगळवारी सकाळी ही बोगी फलाट क्रमांक चारवर लागल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात वाजत -गाजत आणि पारंपरिक पद्धतीने श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया गजराने रेल्वे स्थानक परिसर दणाणून गेला. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते श्रींचेत पूजन व आरती करून स्थापना करण्यात आली. दरवर्षी गणराया मनमाड ते दादर असा प्रवास करतात. दहा दिवस या बोगीमध्ये श्रींची विधिवत पूजा, सकाळ संध्याकाळ आरती केली जाते. हेही वाचा >>> नाशिक : सटाणा लोकन्यायालयात ७२ प्रलंबित खटले निकाली प्रवासी संघटना आणि गोदावरी एक्स्प्रेस गणेश मंडळ, गोदावरीचा राजा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आकर्षक सजावट करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अल्ताफ खान, शहरप्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील आदी उपस्थित होते. गोदावरी एक्स्प्रेस गणेश मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ नरेंद्र खैरे, अध्यक्ष स्वप्निल म्हस्के, कार्याध्यक्ष अॅड. निखिल परदेशी आदींनी उत्सवाचे नियोजन केले आहे. जनजागृतीपर संदेश विचार बदला, शौचालयाचा वापर करा, सतर्क रहा, सावधान रहा, सुरक्षित रहा, बेकायदेशीर कृत्य करु नका, असे हिंदी भाषेतील जागृतीपर संदेश संपूर्ण बोगीत लावण्यात आले असून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.