वातावरणातील बदलाचा परिणाम असल्याचा आरोग्य विभागाचा दावा

नाशिक : करोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या माध्यमातून सक्रिय आहे.  तिसरी लाट ही बालकांसाठी धोकादायक असू शकते असा इशारा राज्य कृतीदल समिती देत असतांना काही दिवसात थंडी, तापामुळे लहान बालके मोठ्या प्रमाणावर आजारी पडत आहेत. यामुळे पालकांमध्ये भीती वातावरण असतांना वातावरणातील बदलामुळे लहान मुले आजारी पडत असल्याचे आरोग्य  विभागाने म्हटले आहे

करोनाची तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनासह राज्य कृती दलाच्या वतीने देण्यात आला आहे. शाळा सुरू व्हाव्यात यासाठी अनुकूल वातावरण नसतांनाही काही ठिकाणी शाळा सुरू झाल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. करोनाच्या मागील दोन लाटांचा अनुभव पाहता तिसरी लाट लसीकरण अभावी बालकांना धोकादायक ठरेल, अशी भीती व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत काही दिवसांमध्ये थंडी, ताप या कारणांमुळे बाल रुग्णांची संख्या वाढली आहे.

लहान बालकांमध्ये सर्दी, नाक चोंदणे, डोकेदुखी, मळमळ, अंगात ताप अशी वेगवेगळी लक्षणे आढळत आहेत. या कारणांमुळे बाल रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालकांमध्ये अस्वस्थता आहे. काही दिवसांपूर्वी बऱ्याच प्रमाणात करोनाचे निर्बंध शिथील झाल्याने पालकांनी खासगी शिकवणी वर्गाना पाल्यांना पाठविणे सुरु केले होते. शहरात अनेक ठिकाणी खासगी शिकवणी वर्ग सुरु झाले आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांकडून करोनाचे नियम पाळण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मुखपट्टी अनेक विद्यार्थी घरातून निघतांना वापरतात. परंतु, नंतर काढून टाकत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसते. त्यातच आता थंडी, तापामुळे विद्यार्थी फणफणू लागल्याने अनेक पालकांनी आपल्या पाल्यास खासगी शिकवणी वर्गास जाणे बंद केले आहे. कोणत्या ना कोणत्या आजाराने बाल रुग्ण संख्या वाढत असल्याने पालकांमध्ये भीती आहे.

बाल रुग्णांची संख्या वाढली हे खरे असली तरी मुलांमध्ये थंडी, तापाचे प्रमाण वाढले आहे. परंतु, ही करोनाची तिसरी लाट नसल्याचे त्यांनी सांगितले. वातावरणात बदल होत आहे. सूर्यप्रकाशाचा अभाव असल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी बालकांना थंडी, तापसह अन्य साथीचे आजार होत आहे.  दिवसाकाठी १०० पैकी २८ बालरुग्ण आढळत आहे. हे टाळण्यासाठी पालकांनी खबरदारी घ्यावी. पाणी उकळून प्यावे, गरम अन्न खावे तसेच बाहेर पडतांना डास चावू नये यासाठी मलम लावून बाहेर पडावे असा सल्ला करोनाविषयक जिल्हा समन्वयक अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिला.