नाशिक : आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या सण, उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा परिसरात ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला असून समाज माध्यमांवर चिथावणीखोर, आक्षेपार्ह संदेशांवर पोलिसांची देखरेख राहणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, गुड फ्रायडे, हनुमान जयंती, रमजान ईद यासहआगामी काळात साजरे होणारे विविध सण, उत्सव, यात्रा या पार्श्वभूमी वर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था कायम राहावी, कोणत्याही सण, उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी सज्जता ठेवली आहे. रमजान महिना सुरू आहे. गुरूवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महावीर जयंती आहे. हे सर्व लक्षात घेता जिल्ह्यात ४० पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे अर्धशक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंग गडावर चैत्र उत्सव सुरु असल्याने दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे गडावरही मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. धार्मिक, सामाजिक तणावास कारणीभूत तसेच जातीय दंगे भडकावणाऱ्या समाजकंटकांची ठाणेनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय समाज माध्यमात कोणी आक्षेपार्ह संदेश, माहिती टाकल्यास त्यावर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. असे संदेश प्रसारित झाल्यास गटप्रमुखासह अन्य सदस्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. सर्वानी सण, उत्सव शांततेत आणि आनंदात साजरे करावेत, कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागेल अशी कृती करु नये, पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस बंदोबस्ताचे स्वरुप
सण, उत्सवांच्या पार्श्वभूमी वर जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये दोन अप्पर अधिक्षक, सहा उपअधिक्षक, ३१ निरीक्षक, १२८ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, १२६३अंमलदार, ९०० गृहरक्षक, दोन राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा, पाच आर.सी.पी, क्युआरटी तुकडय़ा असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.