नाशिक – भारतीय हवाई दलाच्या जगप्रसिद्ध सूर्यकिरण एरोबॅटिक संघाने हॉक एमके १३२ विमानांद्वारे थरारक कसरतीदरम्यान आकाशात केशरी, पांढरा आणि हिरवा रंग भरत बलशाली भारताचे प्रतिबिंब साकारले. या विमानांमध्ये पूर्वी रंगीत धूर सोडणारी प्रणाली अर्थात ‘स्मोक पॉड्स’ नव्हते. विमानांच्या या नाविण्यपूर्ण प्रणालीशी नाशिकचे नाते आहे.
भारतीय हवाई दल आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित एअर शो शुक्रवारी गंगापूर धरण परिसरात अभूतपूर्व उत्साहात पार पडला. सूर्यकिरण एरोबॅटिक हा आशिया खंडात नऊ विमानांचा एकमेव संघ आहे. ‘हॉक एमके १३२‘ नऊ विमानांनी एकमेकांपासून पाच मीटरपेक्षा कमी अंतर राखून प्रचंड वेगात मार्गक्रमण केले.
वैमानिकांनी आकाशात इंग्रजी ‘वाय’ या अक्षराबरोबर बाण, हृदय, मिग विमान आणि हिऱ्यांच्या आकाराच्या आकृत्या तयार केल्या. प्रचंड वेगात वर झेपावणे, तितक्याच वेगाने खाली येऊन मध्यावर पुन्हा सरळ होऊन झेपावणे, विमान पूर्णत: उलट ठेवून मार्गक्रमण करणे, आदी कसरती सादर केल्या. परस्परांसमोरून वेगाने जाताना चक्राकार फिरणाऱ्या चार विमानांनी क्षणभर उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवला.प्रात्यक्षिकादरम्यान विमानांनी भारतीय राष्ट्रध्वजाचे तीन रंग आकाशात तयार केेले. उपस्थितांनी त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
सूर्यकिरण संघाच्या हॉक एमके १३२ विमानात अलीकडेच रंगीत धूर निर्माण करण्यास सक्षम असणारे स्मोक पॉड्स समाविष्ट करण्यात आले. भारतीय हवाई दलाच्या ओझरस्थित ११ देखभाल-दुरुस्ती केंद्राचे हे संशोधन आहे. म्हणजे जिथे त्याची निर्मिती झाली, त्या नाशिकमध्ये सूर्यकिरण संघाने प्रथमच त्याचे सादरीकरण केल्याची माहिती सूर्यकिरण संघाच्या जनसंपर्क अधिकारी कवल संधू यांनी दिली.
ओझरच्या एचएएल कारखान्यालगत हवाई दलाचे ११ देखभाल व दुरुस्ती केंद्र आहे. रंगीत धूर तयार करणारी प्रणाली स्वदेशी असून त्याचे हॉक एमके १३२ विमानात एकत्रीकरण या ठिकाणी झाले आहे. देशातील देखभाल-दुरुस्ती केंद्रात ओझरस्थित हे महत्वाचे केंद्र आहे. १९७५ मध्ये स्थापन झालेल्या या केंद्रात आजवर रशियन बनावटीच्या लढाऊ विमानांची देखभाल, दुरुस्ती सुखोईच्या संपूर्ण दुरुस्तीची व्यवस्था करण्यात आली आहे.
मिग २९ लढाऊ विमानाच्या नुतनीकरणात क्षेपणास्त्र वाहून नेण्याची अधिक क्षमता, इंधन टाकीची क्षमता वाढविताना हवेत इंधन भरण्याची व्यवस्थाही या केंद्राने केली. साधारणत: वर्षभरापूर्वी या केंद्रास ‘प्रेसिडेंट कलर्स’ आणि २०२३ मध्ये देखभाल दुरुस्ती अंतर्गत सर्वोत्कृष्ट दुरुस्ती केंद्राचा सन्मानही प्राप्त झाला. सूर्यकिरण पथकाच्या विमानात नाशिकच्या केंद्राने रंगीत धूर सोडण्याची व्यवस्था (स्मोक पॉड्स) केली आहे.
