scorecardresearch

देशातील पहिल्या महिला हेलिकॉप्टर वैमानिकेच्या यशोगाथेला निर्बंधाचा अडसर

लष्करी अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीत (ओटीएस) प्रशिक्षण पूर्ण करून २०१८ मध्ये त्या लष्करात दाखल झाल्या.

अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : भारतीय हवाई दलात जून २०१६ मध्ये भावना कांत, मोहना सिंह आणि अवनी चतुर्वेदी यांच्या माध्यमातून प्रथमच महिला लढाऊ वैमानिक दाखल झाल्या होत्या. लष्कराच्या हवाई दलात हेलिकॉप्टरचे सारथ्य करण्यासाठी मात्र महिलांना आजवर प्रतीक्षाच करावी लागली. कर्नल अभिलाषा बराक यांनी खडतर प्रशिक्षण पूर्ण करीत ही प्रतीक्षा संपुष्टात आणली आणि लष्करी हवाई दलात पहिल्या हेलिकॉप्टर वैमानिक बनण्याचा मान मिळवला. खरेतर त्यांची यशोगाथा युवतींना प्रेरणादायी. पण, दलाने या महिला वैमानिकास माध्यमांशी संवाद साधण्यावर निर्बंध लादून ती संधी हिरावली.

दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लष्कराला हवाई दलावर विसंबून राहता येत नाही. त्यामुळे ३५ वर्षांपूर्वी भारतीय लष्कराने स्वत:चे स्वतंत्र लष्करी दल स्थापन केले. या दलाची भिस्त मुख्यत्वे हेलिकॉप्टरवर असते. कारण, सीमावर्ती भागात शोधमोहीम, उंच ठिकाणांवर साधन सामग्रीचा पुरवठा, विशेष हवाई मोहिमा अशा जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. भारतीय हवाई दलाने महिलांना वैमानिकपदी संधी देऊन सहा वर्षे लोटल्यानंतर लष्करी हवाई दलाने त्या दिशेने पाऊल टाकले. लष्करातील अधिकाऱ्यांना हवाई प्रशिक्षण देऊन हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून समाविष्ट केले जाते. त्याकरिता गांधीनगर येथे खास कोम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलची स्थापना करण्यात आलेली आहे.

हवाई सरावाचा अनुभव नसणारे अधिकारी या स्कूलमध्ये प्रारंभी पूर्व सैन्य वैमानिक आणि नंतर लढाऊ वैमानिक असे दोन शिक्षणक्रम पूर्ण करतात. त्यानंतर ते हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून सन्मानित होऊन लष्कराच्या हवाई दलात दाखल होतात. स्कुलच्या इतिहासात लढाऊ वैमानिक (कोम्बॅक्ट एव्हिएटर्स) शिक्षणक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये यंदा प्रथमच अभिलाषा बराक या महिलेचा समावेश झाला. पूर्व सैन्य वैमानिक प्रशिक्षणात सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिलाषाला चषक देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांनी टाळय़ांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.

अभिलाषाशी संवाद साधण्यासाठी प्रसारमाध्यमांसह कार्यक्रमात उपस्थित युवती उत्सुक होत्या. परंतु, स्कुलच्या अधिकाऱ्यांनी निर्बंध घातल्याने त्यांना कुणाशीही संवाद साधता आला नाही. अभिलाषा या हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील आहेत. त्यांचे वडील आणि भाऊ सैन्य दलात आहेत. त्यातून त्या लष्करी सेवेकडे आकर्षित झाल्या.

इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन विषयात त्यांनी बी. टेक. पदवी प्राप्त केली. लष्करी अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीत (ओटीएस) प्रशिक्षण पूर्ण करून २०१८ मध्ये त्या लष्करात दाखल झाल्या. आज त्या लष्करी हवाई दलातील देशातील पहिल्या हेलिकॉप्टर वैमानिक ठरल्या आहेत.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian army capt abhilasha barak becomes first woman combat pilot zws

ताज्या बातम्या