नाशिक – ड्रोनने आधुनिक युद्धाचे स्वरूप पूर्णत: बदलले असून भारतीय लष्कराने आपल्या अधिकारी व जवानांना ड्रोन संचालनात पारंगत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याअंतर्गत वर्षभरात लष्कराने ५० हजार जवान आणि अधिकाऱ्यांना ड्रोन हाताळणीत निपुण केले. पुढील पाच वर्षांत सुमारे पाच लाख जवानांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. म्हणजेच तब्बल साडेबारा लाख सक्रिय सैन्याच्या बलाढ्य भारतीय लष्करात जवळपास निम्मे सैन्य ड्रोन संचालनात पारंगत होणार आहे.

कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलचा (कॅट्सचा) दीक्षांत सोहळा आर्मी ट्रेनिंग कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सोहळ्यात आर्मी एव्हिएटर्स, आर्मी हेलिकॉप्टर प्रशिक्षक (इन्स्ट्रक्टर) आणि आरपीएएस अर्थात ‘रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट इन्स्ट्रक्टर’ आणि कम्बाइंड इंटरनल पायलट आणि ऑब्झर्व्हर (संयुक्त वैमानिक व निरीक्षक) या शिक्षणक्रमातील अधिकाऱ्यांचा दीक्षांत सोहळा एकाच वेळी झाला. यावेळी प्रात्यक्षिकात हेलिकॉप्टर्स, मानवरहित विमाने, हेक्झाकॉप्टरचा मोठा ताफा सहभागी झाला होता.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा यांनी युद्धातील ड्रोनचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन भारतीय लष्करी प्रशिक्षणात झालेले बदल अधोरेखित केले. आधुनिक युद्धात ड्रोनची खूप महत्त्वाची व विशेष भूमिका आहे. आज मानवरहित विमाने, ज्याला स्वयंचलित हवाई प्रणाली म्हटले जाते, त्याने युद्धाचे संपूर्ण समीकरण बदलले आहे. मोठी, महागडी शस्त्रे जे काम करतात, तेच काम आज स्वस्तातील ड्रोन करू शकतात.

भारतीय लष्कराने जानेवारी २०२५ मध्ये आपल्या १९ प्रशिक्षण केंद्रांत ड्रोन प्रशिक्षणास सुरुवात केली. त्याअंतर्गत ड्रोनच्या मदतीने कोणतेही काम अत्यंत अचूकतेने करण्यासाठी पूर्वनियोजित योजना, ड्रोनच्या विशिष्ट क्षेत्रात हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचा आराखडा, ड्रोन तुकडी तसेच त्याचे आभासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यासाठी सिम्युलेटर्स तयार करण्यात आले. यावेळी त्यांनी महाराज रणजीत सिंह यांच्या हातावर नेहमी असणाऱ्या बाजचा दाखला दिला. ड्रोन हे आजच्या काळातील सैनिकांसाठी हातावर असणाऱ्या बाजासारखे आहेत; कारण ते सैनिकाला क्षितिजापलीकडे पाहण्याची क्षमता देतात. आज या क्षमतेचा जो प्रभावी वापर करेल, त्याला शत्रूपेक्षा जास्त माहिती मिळवून जलदपणे निर्णय घेण्यात फायदा होईल. म्हणजेच तुम्ही शत्रूला माहितीच्या बळावर पराभूत करू शकता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

वैमानिकांनाही ड्रोन प्रशिक्षण

ड्रोन ठरवलेल्या लक्ष्यावर अत्यंत अचूकतेने हल्ला करू शकते, पुरवठा व्यवस्था, टेहळणी अशी अनेक कामे करते. भारतीय लष्करातील ५० हजार जवान व अधिकारी ड्रोन प्रशिक्षित झाले आहेत. पुढील पाच वर्षांत पाच लाख जवानांना हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. नाशिक येथील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलमधून वैमानिक बनणाऱ्याला ४० तासांचे ड्रोनचे प्रशिक्षण दिले जाते. म्हणजेच आज ते केवळ हेलिकॉप्टर वैमानिक नव्हे, तर मानवासहीत आणि मानवरहित विमानाच्या संघाचाही भाग बनले आहेत.