नाशिक – फेडरेशन ऑफ मोटार स्पार्टस् इंडिया (एफएमएससीआय) मान्यतेने ‘इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिप’ ची (आयएनआरसी) सहावी फेरी नाशिक येथे होत आहे. वेस्टर्न इंडिया स्पोर्टस् इंडियातर्फे (विसा) २७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत रॅली ऑफ महाराष्ट्र (ब्लू बॅन्ड एफएमएससीआय फोर व्हिलर आयएनआरसी २०२५) नाशिक परिसरात होत आहे. विशेष म्हणजे विसाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्षे असून त्यात संस्थेला आयोजनाचा मान मिळाल्याने ही अभिमानास्पद बाब आहे.

मंगळूरचा डीन मस्कारेनहास हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असून उपविजेतेपदासाठी कर्ण कदूर आणि आदित्य ठाकूर यांच्यात चुरस दिसेल. रॅलीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. रॅलीत एमआरएफ, जेके टायर्स यांच्यासह नावाजलेले चालक-सहचालक सहभागी होणार आहेत. याबाबत संयोजक आणि सहप्रायोजकांनी माहिती दिली. गेल्या वर्षातील (२०२५) ही अखेरची फेरी आहे. प्रत्यक्ष रॅलीला सुरुवात होण्याच्या दोन दिवस आधीच नाशिकमध्ये स्पर्धकांच्या गाड्या दाखल होणार आहेत. त्यामुळे रॅलीची तशी धामधुम चार ते पाच दिवस अगोदर सुरु असेल.

यानिमित्ताने नाशिकच्या रस्त्यावर चारचाकीचा आवाज घुमणार आहे. या रॅलीसाठी ब्लू बॅन्ड हे मुख्य प्रायोजक, विसा आयोजक तर एमआरएफच्या जोडीला शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेले सपकाळ नॉलेज हब, श्री रामकृष्ण हॉस्पिटल, ग्रेप कौंटी, मायएफ,पीपीटीएस हे सहप्रायोजक आहेत.
रॅलीचे सपकाळ नॉलेज हब हे मुख्यालय असून या ठिकाणी सर्व्हिस पार्क,कागदपत्र तपासणी व अन्य सर्व प्रक्रिया येथेच पार पाडली जाणार आहे.

२७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत रॅली होणार आहे. २६ आणि २७ फेब्रुवारीला वाहन व कागदपत्र तपासणी होईल. त्यानंतर २७ तारखेला दुपारी ग्रेप कौंटीच्या परिसरात खास नाशिककरांसाठी रॅली ऑफ महाराष्ट्रचा विशेष थरार पाहण्यास मिळणार आहे. दुपारी तीन वाजता प्रवेशद्वार बंद केले जाईल. आणि चारला प्रत्यक्ष रॅलीस सुरवात होईल.

त्र्यंबकेश्वर,पालघर भागात मुख्य थरार

तीन चरणात मुख्य रॅली होईल. त्यासाठी त्र्यंबकेश्वर आणि पालघरमधील गावांची निवड करण्यात आली आहे. २८ तारखेला सकाळी सातला पहिली गाडी नाशिकमधून निघेल. पालघर भागातील पोशरा ते हिरवेगाव (१० किलोमिटर) त्यानंतर दुसऱ्या चरणात करोली ते ओसीरवारा (७ किलोमिटर) आणि तिसऱ्या चरणात कळंब ते खारवळ (२० किलोमिटर) या घाटमाथ्यांच्या आणि अवघड वळण रस्त्यांच्या भागात दोनदा या रॅलीचा थरार अनुभवता येईल.

१ मार्चला पुन्हा सकाळ सत्रात पोशरा, करोली, कळंब या भागात २८ तारखेप्रमाणेच पुन्हा त्याचमार्गावर कार चालवून चालक आपले कसब दाखवतील. डांबरी आणि घाटमाथ्यांच्या अवघड वळणाच्या ठिकाणी कार चालवतांना खऱ्या अर्थाने चालकांचे कौशल्य पहायला मिळेल. या चरणानंतर सकाळी साडेअकराला सपकाळ नॉलेज हब येथे रॅलीचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

सर्व चरणात ठराविक अंतरासाठी चालक-सहचालकांना आपली गुणवत्ता सिध्द करावी लागेल. या रॅलीमुळे दुर्गम भागातील लोकांना थरारक खेळ तोही राष्ट्रीय पातळीवरचा बघायला मिळणार असल्याने गावातील लोकांमध्ये खूप उत्सुकता दिसून येत आहे. नाशिकमध्येच नव्हे तर राज्य,राष्ट्रीयस्तरावर विसाने रॅलीचे सर्वीत्तम आयोजन करून एक वेगळा नावलौकीक मिळवला आहे. विसाने रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. हे औचित्य साधून विसातर्फे कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आले. नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त जलज शर्मा यांच्याहस्ते या बुकचे प्रकाशन झाले.,