नाशिक : ​भारतीय सैन्य दलातील सेवेनंतर निवृत्त होणाऱ्या माजी सैनिकांबरोबरच, अल्पावधीच्या सेवेनंतर सैन्य दलातून बाहेर पडणाऱ्या अग्निवीरांच्या भविष्यातील रोजगाराच्या संधी बळकट करण्यासाठी भारतीय रेल्वेने उभयतांचा मार्ग प्रशस्त केला आहे. भारतीय रेल्वे आणि भारतीय सैन्य दलात सहकार्याची चौकट सुरू करण्यात आली असून त्याअंतर्गत रेल्वेत लेव्हल-१ आणि लेव्हल-२ व त्यावरील पदांवर माजी सैनिक आणि माजी अग्निवीरांना संधी देण्यात येणार आहे. रेल्वेने २०२४-२५ मध्ये माजी सैनिकांसाठी १४,७८८ पदे राखीव ठेवली आहेत. तसेच, रिक्त जागा जलद भरण्यासाठी रेल्वे पाच हजारांहून अधिक माजी सैनिकांना कंत्राटी पद्धतीने ‘पॉइंट्समन’ म्हणून भरती करणार आहे.

​अग्निवीरांना चार वर्षांच्या अल्पकालीन करारावर लष्कर, नौदल आणि हवाई दलात भरती केले जाते. दरवर्षी भरती होणाऱ्यांपैकी केवळ २५ टक्केच कायमस्वरूपी सेवेसाठी पात्र ठरतात. अल्पावधीच्या भरती योजनेवर विरोधकांसह युवा वर्गातून विरोध झाला होता. चार वर्षांच्या कार्यकाळानंतर अग्निवीरांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर, सरकारने सैन्य दलातून बाहेर पडणाऱ्या अग्निवीरांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय आस्थापनांमध्ये प्राधान्य देण्याचे म्हटले होते.

​त्याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वे आणि भारतीय लष्कराने अग्निवीरांसाठी आणि नागरी जीवनात स्थलांतरित होणाऱ्या लष्करी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतरच्या रोजगाराच्या संधींचा विस्तार करण्याच्या उद्देशाने सहकार्याची चौकट सुरू केली आहे. हा उपक्रम लष्करी कारकिर्दीतून नागरी कारकिर्दीकडे सहजतेने वळण्यासाठी रचला गेला आहे. यामुळे रेल्वेमधील नोकरीच्या संधींबद्दल जागरूकता वाढेल आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी एक समर्पित समर्थन प्रणाली तयार होईल.

दरवर्षी मोठ्या संख्येने सैनिक तुलनेने कमी वयात निवृत्त होतात. त्यांच्याकडे समृद्ध कार्यात्मक आणि व्यवस्थापकीय अनुभव, कडक शिस्त आणि राष्ट्रप्रेमाचा उत्साह असतो. रेल्वेतील रिक्त पदे भरताना या प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळाला प्राधान्य देण्याचे रेल्वेने निश्चित केले आहे.

​माजी सैनिकांसाठी प्रमुख रोजगार संधी

​सैन्य दलातील निवृत्त कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि पुनर्वसन हा भारतीय रेल्वेच्या धोरणात्मक चौकटीचा महत्त्वाचा घटक आहे. माजी सैनिक आणि माजी अग्निवीरांसाठी रोजगाराचे विविध मार्ग उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ​माजी सैनिकांसाठी लेव्हल-२ व त्यावरील पदांमध्ये १०% क्षैतिज आरक्षण आणि लेव्हल-१ पदांमध्ये २०% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.

​माजी अग्निवीरांसाठी लेव्हल-२ व त्यावरील पदांमध्ये ५% आणि लेव्हल-१ पदांमध्ये १०% आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे. ​२०२४ आणि २०२५ या वर्षांत रेल्वेच्या रिक्त पदांच्या अधिसूचनांमध्ये एकूण १४,७८८ पदे माजी सैनिकांसाठी राखीव होती. यामध्ये लेव्हल-१ मधील ६,४८५ पदे आणि लेव्हल-२ व त्यावरील ८,३०३ पदांचा समावेश आहे. लेव्हल-१ (पूर्वीचा गट ‘ड’) आणि लेव्हल-२ वरील पदांसाठीची भरती अनुक्रमे रेल्वे भरती कक्ष आणि रेल्वे भरती मंडळे याद्वारे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून केली जाते. ​

कंत्राटी नियुक्त्यांद्वारे तात्काळ सहभाग ​

माजी सैनिकांच्या जलद सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विद्यमान रिक्त पदांची पूर्तता करण्यासाठी, रेल्वे मंत्रालयाने नियमित भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भारतीय रेल्वेमध्ये कंत्राटी पद्धतीने माजी सैनिकांना ‘पॉइंट्समन’ म्हणून भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या विभागीय पातळीवर ५,००० हून अधिक लेव्हल-१ पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत नऊ विभागांनी पॉइंट्समनची भरती करण्यासाठी संबंधित लष्करी संघटनांसोबत सामंजस्य करार केले आहेत. या सहयोगी आराखड्यात सैन्य भरती संस्थांना ही पदे जलद भरण्यासाठी रेल्वे विभागांशी सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.