नाशिक – रेल्वे मंत्रालय आणि खते विभाग यांच्यातील समन्वयाने खरीप हंगाम २०२५ आणि चालू रब्बी हंगामात खतांची रेकची जलद आणि सुरळीत वाहतूक झाल्यामुळे राज्यांना खतांचा वेळेवर पुरवठा करणे दृष्टीपथात आले आहे. एप्रिल-डिसेंबर २०२५ दरम्यान खतांच्या वाहतुकीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. या काळात प्रथमच ५०० लाख मेट्रिक टनाचा टप्पा पार करत एकूण पुरवठ्याने ५३०.१६ लाख मेट्रिक टनाचा टप्पा ओलांडला.
खरीप असो वा रब्बी हंगाम, खतांची वेळेवर उपलब्धता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. तुटवड्यामुळे खतांच्या काळ्या बाजाराला प्रोत्साहन मिळते. शेतकऱ्यांना वेळेवर खते उपलब्ध करण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि खते विभागातील सुधारित समन्वयाचा परिणाम सुरळीत पुरवठ्यावर झाल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. सर्वत्र वेळेवर पुरवठा झाल्यामुळे शेतकऱ्यांना ऐन लागवडीच्या हंगामात खतांची कोणतीही कमतरता भासणार नाही, याची हमी मिळाली. रेल्वे मंत्रालयाच्या प्रयत्नांमुळे देशभरात पुरेशा प्रमाणात खतांचा साठा उपलब्ध करण्यास मदत झाल्याचे खते विभागाने म्हटले आहे. या कालावधीत, जुलै २०२५ मध्ये रेकची सरासरी वाहतूक प्रतिदिन ७२ रेक्सपर्यंत वाढली, ऑगस्ट २०२५ मध्ये ती प्रतिदिन ७८ रेक्स, तर सप्टेंबर २०२५ मध्ये ती प्रतिदिन ८० रेक्सपर्यंत पोहोचली.
२०२५-२६ या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीत सरकारने सर्व राज्यांमध्ये सर्व प्रमुख खतांचा पुरेसा साठा उपलब्ध केला. युरियाची देशात ३१२.४० लाख मेट्रिक टन आवश्यकता असताना सरकारने ३५०.४५ लाख टन साठा उपलब्ध केला. तसेच पी अँड के खतांची (उदा. डीएपी, एमओपी आणि एनपीकेएस) २५२.८१ एलएमटी आवश्यकता होती. त्यासाठी २८७.६९ लाख मेट्रिक टन साठा उपलब्ध करण्यात आला. सातत्याने मूल्यांकन केलेल्या गरजेपेक्षा अतिरिक्त आणि अखंड पुरवठा दिसून आला. राज्यांनीही तळागाळापर्यंतच्या शेतकऱ्यांना खतांचा पुरेसा साठा उपलब्ध व्हावा, यासाठी ठोस उपाययोजना केल्या आहेत.
एप्रिल-डिसेंबर २०२५ दरम्यान खतांच्या वाहतुकीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला, या काळात पहिल्यांदा खतांच्या पुरवठ्याने ५३०.१६ लाख मेट्रिक टनाचा टप्पा ओलांडला. ही आकडेवारी आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या संबंधित कालावधीच्या तुलनेत १२.२ टक्के वाढ दर्शवते, तर आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या मागील विक्रमापेक्षा ८.५ टक्के जास्त आहे.
युरियाची वाहतूक ११ हजार रेकवर
युरिया रेकच्या वाहतुकीत गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ टक्के वाढ नोंदवत संख्या १० हजार ८४१ रेक्सवर पोहोचली, तर पी अँड के खतांच्या वाहतुकीत १८ टक्के वाढ होऊन ती ८ हजार ८९६ रेकवर पोहोचली. रेल्वे मंत्रालय, बंदरे, राज्य सरकारे आणि खत कंपन्या यांच्यातील वाढलेल्या समन्वयामुळे ऐन कृषी हंगामात राज्यांना खतांचा सुरळीत आणि वेळेवर पुरवठा झाल्याचा दावा केला जात आहे.

