जळगाव : जिल्ह्यातील मध्य रेल्वेच्या भुसावळ स्थानकावरून उत्तर भारतातून पुणे तसेच दक्षिणेकडे काही विशेष रेल्वे गाड्या धावतात. त्यापैकी काही गाड्यांना प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता तब्बल चार वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पुणे जाणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

०२१३२ जबलपूर आणि पुणे स्थानकांदरम्यान धावणारी विशेष गाडी सामान्यतः साप्ताहिक सेवा म्हणून चालवली जाते. ती जबलपूरहून दुपारी ०१.५० वाजता वेळी सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.२५ वाजता पुण्याला पोहोचते. सुमारे १६ तास ३५ मिनिटांत सुमारे १०४४ किलोमीटरचे अंतर कापते. या विशेष गाडीला इटारसी, बऱ्हाणपूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. जबलपूर–पुणे विशेष रेल्वे गाडी पूर्वी एक मार्च २०२६ पर्यंत अधिसूचित होती. सदर गाडीचा संचालन कालावधी वाढवून आता २९ डिसेंबर २०३० पर्यंत करण्यात आला आहे. याशिवाय, ०२१३१ पुणे–जबलपूर साप्ताहिक विशेष गाडी पूर्वी दोन मार्च २०२६ पर्यंत अधिसूचित होती. सदर गाडीचा संचालन कालावधी वाढवून आता ३० डिसेंबर २०३० पर्यंत करण्यात आला आहे.

०२१९८ जबलपूर आणि कोईम्बतूर जंक्शन दरम्यान धावणारी एक साप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वे गाडी आहे. जी शुक्रवारी ११:५० वाजता जबलपूरहून सुटते आणि तिसऱ्या दिवशी दुपारी ०२:३० वाजता कोईम्बतूरला पोहोचते. या प्रवासात ती २५१८ किमी अंतर कापते. आणि इटारसी, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रत्नागिरी, मडगाव, मंगळूर या प्रमुख स्थानकांवर थांबते. जबलपूर–कोईम्बतूर साप्ताहिक विशेष गाडी पूर्वी सहा मार्च २०२६ पर्यंत अधिसूचित होती. सदर गाडीचा संचालन कालावधी वाढवून आता २७ डिसेंबर २०३० पर्यंत करण्यात आला आहे. याशिवाय, ०२१९७ कोईम्बतूर–जबलपूर साप्ताहिक विशेष गाडी पूर्वी नऊ मार्च २०२६ पर्यंत अधिसूचित होती. सदर गाडीचा संचालन कालावधी वाढवून आता ३० डिसेंबर २०३० पर्यंत करण्यात आला आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या दोन्ही विशेष रेल्वे गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक, मार्गावरील थांबे, आगमन-प्रस्थानाची अचूक वेळ तसेच इतर अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवाशांना http://www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर गाडी क्रमांक टाकून संबंधित विशेष रेल्वेची संपूर्ण माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. यासोबतच, प्रवाशांनी ‘नॅशनल ट्रेन एनक्वायरी सिस्टीम’ (NTES) हे अधिकृत मोबाईल ॲप आपल्या स्मार्टफोनवर डाउनलोड केल्यास प्रत्यक्ष वेळेतील (रिअल टाइम) गाडीची स्थिती, उशीर, प्लॅटफॉर्म क्रमांक तसेच पुढील थांब्यांची माहिती मिळू शकणार आहे. प्रवासापूर्वी अधिकृत संकेतस्थळ किंवा ॲपवरूनच माहितीची खात्री करून घ्यावी, असे मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ कार्यालयाने स्पष्ट केले आहे.