जळगाव: भारतीय रेल्वेच्या प्रवासी डब्यांवर, इंजिनावर किंवा इतर उपकरणांवर विविध सांकेतिक खुणा, चिन्हे आणि आकडे हमखास दिसून येतात. या खुणांचा नेमका अर्थ काय असतो, याबाबत अनेक वेळा प्रवाशांच्या मनात कुतूहल आणि संभ्रम निर्माण होत असतो. समाधानाची बाब म्हणजे प्रवाशांना कोड्यात टाकणाऱ्या या खुणांचा अर्थ आता खुद्द मध्य रेल्वे प्रशासन उलगडून सांगताना दिसत आहे.

प्रवाशांना कोड्यात टाकणाऱ्या सांकेतिक चिन्हांपैकी रेल्वे गाडीच्या शेवटच्या डब्यावर असलेले “X” हे चिन्ह त्यापैकीच एक. आणि ते रेल्वेसाठी महत्त्वाचे देखील मानले जाते. यासह इतर अनेक खुणांविषयी प्रवाशांना माहिती देण्याकरीता मध्य रेल्वे प्रशासनाने आता विशेष पुढाकार घेतला आहे. प्रवाशांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेने समाज माध्यमांचा वापर करण्यास सुरुवात देखील केली आहे. अधिकृत समाज माध्यम खात्यांद्वारे रेल्वे डब्यांवरील विविध सांकेतिक खुणांचे अर्थ स्पष्ट करणारी माहिती छायाचित्रांसह प्रसिद्ध केली जात आहे. या माध्यमातून रेल्वे व्यवस्थेची कार्यपद्धती, सुरक्षा उपाययोजना आणि तांत्रिक बाबींबाबत सामान्य प्रवाशांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे गाडीच्या शेवटच्या डब्यावर रंगवलेले “X” हे चिन्ह अत्यंत महत्त्वाचे असते. हे चिन्ह गाडी पूर्ण झाल्याचे दर्शवते. म्हणजेच गाडीचा शेवटचा डबा सुरक्षितपणे गेला आहे आणि एकही डबा मार्गात मागे राहिलेला नाही, याची खात्री या चिन्हामुळे करता येते. रेल्वे मार्गावर काम करणारे तसेच सिग्नल विभागातील कर्मचारी तसेच स्थानकावरील कर्मचारी गाडी जाताना शेवटच्या डब्यावर हे चिन्ह पाहून संपूर्ण गाडी सुरक्षितपणे पुढे गेल्याची खात्री करून घेतात.

काही वेळा तांत्रिक बिघाड, कपलिंग सुटणे किंवा इतर कारणांमुळे डबे वेगळे होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत जर शेवटच्या डब्यावर “X” चिन्ह दिसले नाही, तर लगेच सतर्कता बाळगली जाते. त्यामुळे रेल्वे सुरक्षा व्यवस्थेत या चिन्हाला विशेष महत्त्व आहे.

याशिवाय अनेक गाड्यांच्या शेवटच्या डब्यावर “X” चिन्हासोबत लाल रंगाचा दिवा किंवा परावर्तित फलक (रिफ्लेक्टर) देखील लावलेला असतो. रात्रीच्या वेळी किंवा कमी प्रकाशातही शेवटचा डबा ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे रेल्वे मार्गावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गाडीचा शेवटचा भाग स्पष्टपणे दिसू शकतो. रेल्वे डब्यांवर असलेल्या इतर खुणांनाही विशिष्ट अर्थ असतो. उदाहरणार्थ, डब्यावर लिहिलेले क्रमांक त्या डब्याचे उत्पादन वर्ष, त्याचा प्रकार किंवा तो कोणत्या कारखान्यात तयार झाला आहे याची माहिती देतात. काही खुणा डब्याच्या देखभाल तपासणीशी संबंधित असतात, तर काही चिन्हे प्रवाशांसाठी सुविधा किंवा सुरक्षिततेशी संबंधित असतात.

प्रवाशांना रेल्वे प्रणालीबद्दल अधिक माहिती मिळावी आणि त्यांच्यात जागरूकता वाढावी यासाठी अशा माहितीपर मोहिमा मध्य रेल्वे प्रशासनाकडून पुढेही राबविण्यात येणार आहेत. समाज माध्यमांद्वारे टप्प्याटप्प्याने रेल्वेशी संबंधित विविध रंजक आणि उपयुक्त माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या माहितीमुळे प्रवाशांना रेल्वे व्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास मदत होईल. तसेच रेल्वे सुरक्षा व्यवस्थेबद्दल विश्वासही वाढेल. रेल्वे प्रशासनाचा हा उपक्रम प्रवाशांसाठी माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.