जळगाव : भारतीय रेल्वेने अलीकडेच प्रवासी भाडेवाढ केल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त झाली होती. मात्र, रेल्वेच्या अनारक्षित जनरल (सामान्य) तिकिटांवर आता तीन टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे तिकीट दरातील या सवलतीचा लाभ रेल्वे प्रवाशांना मकर संक्रांतीपासून म्हणजेच १४ जानेवारीपासून घेता येणार आहे.

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत रेलवन ॲपद्वारे अनारक्षित (सामान्य) तिकिटे बुक केल्यानंतर प्रवास भाड्यात तीन टक्के सूट जाहीर केली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, ही सवलत १४ जानेवारी ते १४ जुलै २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे आणि रेलवन ॲपचा वापर वाढवणे, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. या संदर्भात रेल्वे मंत्रालयाने सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्सला पत्र पाठवून आवश्यक सॉफ्टवेअर बदल करण्याची विनंती यापूर्वीच केली होती. त्यानुसार, सॉफ्टवेअरमध्ये बदल झाल्यानंतर अनारक्षित तिकिटांवरील प्रवास भाड्यात सवलत लागू होत आहे.

सर्व डिजिटल व्यवहारांवर सूट

महत्त्वाची बाब म्हणजे, अनारक्षित तिकिटांवरील तीन टक्के सूट केवळ आर-वॉलेट पर्यंत मर्यादित न राहता, रेलवन ॲपवर वापरल्या जाणाऱ्या सर्व डिजिटल पेमेंट पद्धतींसाठी उपलब्ध असेल. यामध्ये युपीआय, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड तसेच नेट बँकिंगद्वारे केलेल्या पेमेंटचा समावेश आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रवासी कॅशलेस पद्धतीने तिकिटे बुक करण्यास प्रोत्साहित होतील, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

आर-वॉलेट वापरकर्त्यांना डबल फायदा

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, सध्या रेलवन ॲपवर आर-वॉलेट वापरून रेल्वे प्रवासाची अनारक्षित तिकिटे बुक केल्यास तीन टक्के कॅशबॅक दिला जातो. ही योजना यापुढेही सुरूच राहणार आहे. त्यात आता नव्याने जाहीर झालेली तीन टक्के थेट सूट जोडली जाणार आहे. परिणामी, १४ जानेवारीपासून आर-वॉलेट वापरून रेलवन ॲपद्वारे तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांना एकूण सहा टक्क्यांपर्यंत आर्थिक लाभ मिळू शकणार आहे.

रांगेत उभे राहण्याची गरज नाही

रेल्वे प्रशासनाच्या मते, नवीन निर्णयामुळे रांगेत उभे राहून तिकिटे काढण्याची गरज कमी होईल. तसेच तिकिट खिडकीवरील प्रवाशांची गर्दीही आटोक्यात येईल. डिजिटल इंडिया उपक्रमाला हातभार लावत रेल्वेकडून प्रवाशांना अधिक सोयीस्कर, जलद आणि कॅशलेस सेवा देण्याचा हा प्रयत्न असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. एकंदरीत, रेलवन ॲपवरील ही सवलत योजना सामान्य प्रवाशांसाठी आर्थिकदृष्ट्या खूपच फायदेशीर ठरणार असून, डिजिटल तिकिट बुकिंगकडे प्रवाशांचा कल अधिक वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रेलवन ॲप वापरले तरच सूट

रेल्वे प्रशासनाने अनारक्षित (सामान्य) तिकिटांवरील तीन टक्के सवलतीबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही सवलत फक्त अधिकृत रेलवन ॲपवरून अनारक्षित तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांनाच मिळणार आहे. इतर कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्म, ॲप किंवा वेबसाइटवरून जनरल तिकिटे बुक केल्यास या सवलतीचा लाभ संबंधित प्रवाशांना मिळणार नाही.