जळगाव : मध्य रेल्वे प्रशासनाकडून एक ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटांची वैधता आणि सत्यता तपासण्याबरोबरच सवलतीच्या दरातील तिकिटे, विशिष्ट आरक्षण कोटा तसेच विविध प्रकारच्या पासचा गैरवापर रोखण्यावर या मोहिमेत विशेष भर दिला जाणार आहे. स्थानकांवर तसेच रेल्वे गाड्यांमध्ये प्रवासादरम्यान ही तपासणी केली जाणार आहे.

या मोहिमेदरम्यान सवलत किंवा विशिष्ट आरक्षण कोटाअंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे त्यांच्या पात्रतेचा पुरावा देणारे विहित मूळ ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रे आहेत की नाहीत, याची तपासणी प्रामुख्याने केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीटासोबत संबंधित मूळ कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे. एकाच तिकिटावर एकापेक्षा अधिक प्रवाशांचे आरक्षण असल्यास त्या तिकिटावरील किमान एका प्रवाशाकडे आरक्षणाच्या वेळी नोंदवलेले विहित मूळ ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. आवश्यक मूळ ओळखपत्र किंवा पात्रतेचा पुरावा सादर करता न आल्यास, लागू रेल्वे नियमांनुसार त्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना वैध तिकिटाशिवाय प्रवास करणारे मानले जाऊ शकते. अशा वेळी संबंधित सर्व प्रवाशांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते.

सवलतीच्या तिकिटांसह पासवर विशेष लक्ष

सवलतीच्या तिकिटांचा गैरवापर टाळण्यासाठी तपासणी अधिक कडक केली जाणार आहे. विशिष्ट सवलत किंवा आरक्षण कोट्याचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांनी त्यासाठी पात्र असल्याचे सिद्ध करणारी विहित कागदपत्रे प्रवासादरम्यान जवळ ठेवणे आवश्यक आहे. ई-पास आणि पीटीओच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही विहित मूळ ओळखपत्र सोबत ठेवावे. तसेच प्रवास सुरू करण्यापूर्वी ई-पास किंवा पीटीओच्या बदल्यात अधिकृत तिकीट अथवा आवश्यक प्रवास पास प्राप्त केला आहे, याची खात्री करावी लागणार आहे.

अनारक्षित तिकिटांचीही पडताळणी

अनारक्षित तिकिटांच्या सत्यतेचीही या मोहिमेत विशेष तपासणी केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार तिकीट तपासणी कर्मचारी ‘टीटीई ॲप’च्या माध्यमातून तिकिटांचे प्रमाणीकरण आणि पडताळणी करणार आहेत. त्यामुळे बनावट, अनधिकृत किंवा चुकीच्या पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या तिकिटांवरही कारवाई केली जाणार आहे. आरक्षण सुविधांचा गैरवापर रोखणे, सवलतीच्या तिकिटांचा आणि विविध पासचा फसवणुकीने होणारा वापर थांबवणे तसेच रेल्वेच्या महसुलातील गळती रोखणे, हा या विशेष मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. स्थानकांसह रेल्वेगाड्यांमध्येही तिकीट तपासणी पथकांकडून विशेष तपासणी केली जाणार आहे.

प्रवाशांना नियम पालन करण्याचे आवाहन

मध्य रेल्वेने प्रवाशांना प्रवास करताना वैध तिकीट सोबत ठेवण्याचे आवाहन केले आहे. सवलत, आरक्षण कोटा किंवा पासच्या आधारे प्रवास करणाऱ्यांनी संबंधित पात्रता कागदपत्रे आणि विहित मूळ ओळखपत्र जवळ ठेवावे. तिकीट तपासणीदरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांच्या वतीने प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.