नाशिक – रशिया-युक्रेन युद्ध असो की, गेल्या वर्षीचा भारत-पाकिस्तान संघर्ष. जगभरात ड्रोनचा युद्धात वापर झपाट्याने वाढत आहे. थेट संपर्काविना लढल्या जाणाऱ्या युद्धाच्या काळात ड्रोन युद्धात पारंगत होण्यासाठी आता तोफखाना दलात जवान ते अधिकारी अशा प्रत्येकालाच ड्रोन प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे.

देवळाली कॅम्पस्थित तोफखाना स्कूलतर्फे बुधवारी आयोजित तोपची वार्षिक सोहळा वेलिंग्टनच्या संरक्षण सेवा महाविद्यालयाचे कमांडंट लेफ्टनंट जनरल मनिश एरी आणि तोफखाना स्कूलचे कमांडंट लेफ्टनंट जनरल नवनीत सिंह सरना यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रात्यक्षिकांतून तोफखान्याची प्रहारक क्षमता आणि विविध प्रकारच्या ड्रोनच्या कामगिरीचे दर्शन घडविण्यात आले. युद्धभूमीवर टेहेळणी आणि हल्ले चढविण्यात ड्रोन परिणामकारक ठरतात, लष्करी कारवाईला ड्रोनने नवी दिशा मिळते. भविष्यातील युद्धे मुख्यत्वे ड्रोनवर आधारित असतील. हे लक्षात घेऊन त्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले आहे.

एकात्मिक युद्ध विभागाच्या निर्मितीत अनेक बदल घडत आहेत. बहुविध युद्धक्षेत्रात तीनही सैन्यदलांची ताकद एकत्रितपणे वापरण्याची संकल्पनाही संयुक्त प्रशिक्षणातून आकारास येत आहे. त्या अंतर्गत भारतीय नौदलाच्या आयएनएस द्रोणाचार्य संस्थेतील प्रशिक्षणार्थींना तोफखाना स्कूलमध्ये ड्रोन प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनी ड्रोन प्रात्यक्षिकातही सहभाग घेतला. तोफखाना दलाकडून टेहेळणी, लक्ष्यावर हल्ला चढविणे आणि तोफखान्याच्या माऱ्यानंतर नुकसानीचे अवलोकन करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो. लष्कराच्या भात्यात सर्चर मार्क – १, सर्चर मार्क – २, हेरॉन, अमेरिकन बनावटीचे प्रिडेटर एमक्यू-१, हारुप, निशांत, रुस्तुम, ईगल ड्रोनसह स्काय स्ट्राईकरसारखे कामिकाझे ड्रोन’ अर्थात आत्मघाती ड्रोन आहेत. आधुनिक युद्धात ड्रोन अविभाज्य भाग बनल्याने तोफखाना दलाने प्रत्येकास ड्रोनचे प्राथमिक ज्ञान व प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

मागील काही युद्धात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे जवानांपासून अधिकाऱ्यांपर्यत प्रत्येकाला ड्रोनचे प्रशिक्षण दिले जाते. यंदा तोपची सोहळ्यात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवानही पहिल्यांदा सहभागी झाले. भारतीय नौदलाच्या आयएनएस द्रोणाचार्य संस्थेतील काही प्रशिक्षणार्थींना तोफखाना स्कूलमध्ये ड्रोनचे प्रशिक्षण देण्यात आले. – लेफ्टनंट जनरल नवनीत सिंह सरना (कमांडंट, तोफखाना स्कूल)