नाशिक – देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या नियोजनातील अभावाचा नाशिकहून दिल्ली आणि बंगळुरु प्रवासी विमानसेवेला बसला आहे. इंडिगो एअरलाइन्स वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये तर तांत्रिक बिघाड, पायलट आणि क्रू कर्मचाऱ्यांची कमतरता यांसह इतर कारणांमुळे कंपनीने एकाच दिवसात १०० हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द केली होती. त्यामुळे इंडिगोची विमानसेवा कधीही रद्द होऊ शकते, असा समज प्रवाशांमध्ये पसरु लागला आहे.

नाशिकच्या ओझर विमानतळावरुन दिल्ली आणि बंगळुरुसाठी इंडिगोची प्रवासी विमानसेवा सुरु आहे. परंतु, फेब्रुवारीतील उर्वरित दिवसांकरिता कंपनीने प्रवासी विमानसेवेसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचा फटका प्रवाशांना बसणार आहे.आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, अलिकडेच नाशिकच्या ओझर विमानतळाचे विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

विस्तारीकरणानंतर ओझर विमानतळावरुन प्रवासी विमानांंच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असताना सध्या मात्र ओझर विमानतळावरुन इतर शहरांसाठी होणारी विमानसेवा कधीही रद्द होणे, विमानसेवेत कपात होणे, असे प्रकार घडत आहेत. त्यात इंडिगो एअरलाइन्सने ओझर विमानतळावरुन दिल्ली आणि बंगळुरुसाठी सुरु असलेल्या आपल्या विमानसेवेत काही प्रमाणात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

फेब्रुवारीतील उर्वरित दिवसांसाठी हा निर्णय लागू राहणार आहे.ओझर विमानतळारुन नवीदिल्लीसाठी दररोज सकाळी आणिी सायंकाळी विमानसेवा सुरु होती. परंतु, आता ११ फेब्रुवारीपासून या विमानसेवेच्या काही फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. त्यासाठी इंडिगोने कार्यान्वयन कारण दिले आहे. त्यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या उर्वरित दिवसांसाठी ओझर विमानतळावरुन नवीदिल्लीसाठी रविवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी सकाळची सेवा सुरु राहणार आहे. म्हणजेच सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस सकाळची विमानसेवा बंद राहणार आहे.

सायंकाळच्या सेवेत आठवडाभर कोणताच बदल करण्यात आलेला नाही. आठवडाभर दररोज सायंकाळची सेवा राहणार आहे.बंगळुरुसाठी ओझर विमानतळावरुन दिवसातून एक प्रवासी विमान उड्डाण घेते. परंतु, आता फेब्रुवारी महिन्यासाठी मंगळवार आणि गुरुवार हे दोन दिवस ही विमानसेवा बंद राहणार आहे. यानुसार दिल्ली आणि बंगळुरु दोन्ही ठिकाणच्या प्रवासी विमानसेवेत करण्यात आलेल्या बदलानुसार फेब्रुवारीतील उर्वरित दिवसांसाठी दिल्लीसाठीचे आठ आणि बंगळुरुसाठीचे पाच उड्डाण कमी करण्यात आले आहेत.

पुढील महिन्यात स्थिती पूर्ववत होण्याची प्रवाशांना आशा आहे. सात फेब्रुवारी रोजी ओझर विमानतळार सर्वाधिक प्रवासी संख्येची नोंद करण्यात आली होती. या एकाच दिवसात सात विमानांव्दारे एक हजार ९७३ प्रवाशांनी नाशिक ये-जा केले. त्यात विमानतळावर इतर शहरांमधून ८५८ प्रवाशांचे आगमन झाले. तर ओझर विमानतळावरुन इतर शहरांसाठी ९३५ प्रवाशांनी प्रस्थान केले. ओझर विमानतळावरुन प्रवासी विमान सेवा नियमितपणे सुरु राहिल्यास या संख्येत अजून वाढ होऊ शकते, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.