जळगाव – पाईप, डाळमिल आणि चटई उत्पादनात आघाडीवर असलेल्या शहरातील औद्योगिक वसाहतीला आणखी विकसित करण्याच्या दृष्टीने लवकरच पाऊले उचलण्यात येणार असून, विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी सुमारे २०० एकर जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही त्याकरीता अनुकूलता दर्शवली आहे.
आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रीकल्चर चेंबरच्या शिष्टमंडळाने घेतली. त्यावेळी मंत्री सामंत यांनी जळगावच्या औद्योगिक वसाहतीचा विकास करण्यासाठी विविध प्रस्तावांना मान्यता दिली. याप्रसंगी उपाध्यक्ष संगिता पाटील, नियामक परिषदेचे सदस्य किरण बच्छाव, महेंद्र रायसोनी, अरविंद दहाड, अश्विन परदेशी, तसेच एमआयडीसीचे अधिकारी सुनील घाटे, उद्योग भारतीचे अध्यक्ष प्रमोद संचेती, रवी फालक, संतोष इंगळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दूरदृश प्रणाणीद्वारे सहभाग घेतला.
जळगावमध्ये चटई समूह विकास केंद्र
महाराष्ट्र चेंबरने जळगावच्या विकासाच्या प्रश्नांचा शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याचीच फलश्रुती म्हणून जळगावमध्ये नवीन औद्योगिक वसाहत विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित उद्योगांसाठी २०० एकर जागा राखीव ठेवण्यात येणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. याशिवाय, जळगावमध्ये चटई समूह विकास केंद्र (क्लस्टर) उभारण्यासाठी एक एकर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला आहे. औद्योगिक वसाहतीमधील रस्ते दुरुस्त करण्यासाठीही आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच कामगारांसाठी ई-बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. उद्योगमंत्र्यांनी शासनाच्या माध्यमातून कामगारांसाठी घरे उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या असून, जळगाव शहरात उभारल्या जाणाऱ्या उद्योग भवनाचे काम संथ गतीने सुरू असल्याने कंत्राटदार बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जळगावच्या औद्योगिक वसाहतीत काही जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय महिला उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी विशेष सवलती आणि सुविधा मिळणार आहेत.
संगिता पाटील (उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स)