scorecardresearch

त्र्यंबकेश्वर परिसरातील तीर्थकुंडांच्या पुनरुज्जीवनासाठी उपक्रम; पर्यावरणप्रेमींसह विविध संस्थांचा पुढाकार

पर्यावरणप्रेमी संस्थांनी एकत्र येऊन त्र्यंबकेश्वर परिसरातील तीर्थकुंड पुनरुज्जीवन उपक्रम हाती घेतला आहे.

त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांना कुशावर्त या तीर्थकुंडाचीच अधिक माहिती असते

नाशिक : पर्यावरणप्रेमी संस्थांनी एकत्र येऊन त्र्यंबकेश्वर परिसरातील तीर्थकुंड पुनरुज्जीवन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे तीर्थकुंडांचे गाव म्हणूनही त्र्यंबकची ओळख होण्यास मदत होईल. धार्मिक पर्यटनासाठी त्र्यंबकेश्वरला येणारे भाविक आणि पर्यटक या तीर्थकुंडांना हमखास भेट देतील, अशी पर्यावरणप्रेमींना आशा आहे.

  त्र्यंबकेश्वराच्या मंदिरामुळे, संत निवृत्तीनाथांच्या समाधी मंदिरामुळे, ब्रम्हगिरीमुळे त्र्यंबकची संपूर्ण देशात ओळख आहे. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी दररोज देशाच्या वेगवेगळय़ा भागातून भाविक येत असतात. त्र्यंबकला आल्यावर हे भाविक गावातील इतर मंदिरांनाही भेट देतात. परंतु, हे भाविक आणि पर्यटक त्र्यंबक परिसरात असलेल्या अनेक तीर्थकुंडांच्या माहितीपासून वंचित आहेत. भाविकांना कुशावर्त या एकमेव कुंडाची माहिती असते. या कुंडातच भाविक स्नान करतात. कुंभमेळय़ातही साधु, महंत कुशावर्तात स्नान करीत असल्याने कुशावर्ताची माहिती संपूर्ण भारतात आहे. परंतु, याशिवाय ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मार्गावर १०८ तीर्थकुंड आहेत. या कुंडांचे धार्मिक, आध्यात्मिकदृष्टय़ा अनन्यसाधारण महत्त्व आहे. या तीर्थाची स्वच्छता आणि पुनरुज्जीवन करणे हे गोदावरी अविरत प्रवाहित राहण्यासाठी गरजेचे ठरले आहे.

त्र्यंबकेश्वर येथील ललित गुरूंचा हरित ब्रह्मगिरी चमू, त्र्यंबकेश्वर देवस्थान, त्र्यंबकेश्वर येथील निसर्गप्रेमी यांचा पुढाकार आणि सहकार्याने या १०८ तीर्थाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या तीर्थाचा शोध घेऊन, त्यांची  पाहणी करत असतांना या तीर्थाच्या जीर्णोद्धारासाठी महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्थांनीही मदत करण्याचे ठरविले. चंद्रकांत कुलकर्णी यांच्या देश के सच्चे हिरो प्रतिष्ठानने त्र्यंबक नगरीतील मनकर्णिका या तीर्थाचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरविले आहे. दीक्षित परिवार या तीर्थाच्या स्वच्छतेसाठी अनेक वर्षांपासून मेहनत घेत आहेत. दीक्षित यांच्या मालकी हद्दीत असणाऱ्या या तीर्थाच्या पुनरुज्जीवनाची परवानगी  दीक्षित परिवाराने आणि त्र्यंबक नगर परिषदेने दिली आहे.

ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या तीर्थाची स्वच्छता आणि पुनरुज्जीवनासाठी परवानगी याबाबत अय्यर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची पर्यावरणप्रेमी संस्था सदस्यांनी नुकतीच भेट घेतली. बनसोड यांनी या विषयाची निकड लक्षात घेता ग्रामपंचायत हद्दीतील तीर्थाचे, कुंडांचे सर्वेक्षण करून मनरेगाच्या माध्यमातून जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यातील सर्व तीर्थाचा, कुंडांचा शोध घेऊन त्यांचे पुनरुज्जीवन करण्यास लवकरच सुरूवात होणार आहे. नागरिकांनी आपल्याला परिचित तीर्थाची कुंडाची माहिती देण्यासाठी ९८३४०२८५९९. ८६००८३६०५८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्र्यंबक परिसरातील सर्व कुंडांचे पुनरुज्जीवन झाल्यास या तीर्थक्षेत्राच्या धार्मिक महत्त्वात अधिकच भर पडणार आहे.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Initiatives revival trimbakeshwar initiatives various organizations including environmentalists ysh

ताज्या बातम्या