महिलेच्या मृत्यूनंतर यंत्रणांना जाग

नाशिक : नायलॉन मांजामुळे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जाग आलेल्या महापालिकेने शहरातील पतंग विक्रेत्यांकडे नायलॉन मांजाची तपासणी सुरू केली आहे. प्रतिबंधित मांजाची विक्री होऊ नये म्हणून संबंधितांचे प्रबोधन केले जात आहे. वाहनधारकांना अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने नायलॉन मांजावर बंदी आणली. पतंग, मांजा विक्रेते सावध झाले असून बहुतेकांनी आपल्या दुकानांसमोर नायलॉन मांजा विक्रीसाठी नसल्याचे फलक लावले आहेत. महापालिकेच्या पथकांनी काही ठिकाणी विक्रीस ठेवलेले प्लास्टिकचे पतंग जप्त केले.

शहर, परिसरात मकर संक्रातीच्या दिवशी पतंगोत्सव उत्साहात साजरा केला जातो. त्याची धूम सर्वत्र आधीच सुरू झाली आहे. पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा पक्ष्यांसह नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. काही दिवसांपूर्वी भारती जाधव या महिलेचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला गेल्याने मृत्यू झाला. उड्डाणपुलावरून दुचाकीने घरी येत असताना त्यांच्या गळ्यात मांजा अडकून ही दुर्घटना घडली.

नायलॉन मांजा पशुपक्ष्यांसह नागरिकांसाठी घातक ठरत असल्याचे मागील काही वर्षांतील दुर्घटनांवरून स्पष्ट झाले आहे. मध्यंतरी वनविभागाने या मांजामुळे गेल्या दोन वर्षांत ६६ पक्ष्यांचा मृत्यू झाला, तर ३००हून अधिक पक्षी जखमी झाल्याची आकडेवारी दिली होती. दुचाकीवर मांजा गळ्यात अडकून आजवर अनेकदा अपघात होऊन वाहनधारक जखमी झाले.

पर्यावरणास हानीकारक असलेल्या नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री आणि वापरावर बंदी आहे. मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर, बेकायदेशीरपणे या मांजाची विक्री करणाऱ्यांविरोधात यंत्रणेने मोहीम राबविणे अपेक्षित होते, परंतु तसे काही घडले नाही. मांजामुळे महिलेला जीव गमवावा लागल्यावर यंत्रणांना जाग आली आहे.

उपरोक्त दुर्घटनेनंतर शहर पोलिसांनी तातडीने अधिसूचना काढून ३० दिवसांसाठी नायलॉन मांजावर बंदी घातली. पतंगोत्सवात वापरला जाणारा नायलॉन मांजा झाडे, वीज वाहिन्या, इमारतींच्या गच्चीवर अडकून पडतो. तो नष्ट होत नसल्याने त्यात अडकून पशुपक्ष्यांचा मृत्यू वा जखमी होण्याचे प्रकारवाढत आहे.

पतंगाच्या मांज्यामुळे दुचाकी वाहनधारक, विद्यार्थी जखमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून २८ जानेवारी २०२१ पर्यंत नायलॉन मांजाची निर्मिती, ज्या मांजाला काचेचे आवरण आहे त्याची साठवणूक, वापर करण्यावर पोलिसांनी बंदी घातली आहे. वनविभागाने नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नायलॉन मांजावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी महापालिकेच्या पथकांनी पतंग विक्रेत्यांकडे नायलॉन मांजाची तपासणी करण्यास सुरुवात केली. पंचवटी विभागात नायलॉन मांजाची तपासणी करण्यात आली. तपासणीवेळी काही दुकानांमध्ये प्लास्टिक पतंगांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले.

हे पतंग जप्त करण्यात आल्याचे उपायुक्त डॉ. कल्पना कुटे यांनी सांगितले. दूध बाजार परिसरात तपासणी करून प्रतिबंधित नायलॉन मांजाबाबत प्रबोधन करण्यात आले. बहुतांश दुकानांसमोर ‘येथे नायलॉन मांजा मिळणार नाही, चौकशी करू नये’ असे फलक लागले आहेत. पथकांनी छाननी केली असली तरी विक्रेत्यांकडे नायलॉन मांजा मिळून आला नाही. बंदीमुळे चोरी छुप्या पद्धतीने त्याची विक्री होत असल्याची चर्चा आहे.