लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्वच राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेत या स्थितीला महापालिकेला जबाबदार धरले असताना खड्डे बुजविण्याच्या चाललेल्या कामांची मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी अकस्मात पाहणी केली. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहनधारकांसह नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. लहान-मोठे अपघात सातत्याने घडतात. हे वर्ष विधानसभा निवडणुकीचे असल्याने राजकीय पक्षांना याप्रश्नी भूमिका घ्यावी लागली. खड्ड्यांच्या विषयावर माजी महापौर दशरथ पाटील यांनी मागील वर्षी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेना ठाकरे गटाने जेलरोडवरील खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बैलगाडी व घोडे रस्त्यावर आणले होते. मनसेने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ढोल वाजवत मडकी फोडली होती. या स्पर्धेत भाजपचे लोकप्रतिनिधी मागे राहिले नाहीत. त्यांनी मनपा आयुक्तांना धारेवर धरले होते.

हेही वाचा >>>पाच दिवसांत १७०७ गणेश मूर्ती संकलित; नाशिक महापालिकेचा मूर्ती दान उपक्रम

मनपा आयुक्त डॉ. करंजकर यांनी रस्त्यांची डागडुजी करून खड्डे बुजविण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. अनेक भागात ही कामे प्रगतीपथावर आहेत. आयुक्त करंजकर यांनी अकस्मात नवीन नाशिक, सिडको आणि सातपूर विभागात भेटी देत खड्डे दुरुस्ती, डागडुजीच्या कामांची पाहणी करीत माहिती घेतली. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.