नाशिक : पुणे मनपा प्रशासनाने तृतीयपंथीयांना तीन हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर विभागातील मनपा प्रशासनाने संबंधितांना मानधन देण्याचा विचार करावा, अशी सूचना तृतीयपंथी कल्याण आणि हक्कांचे संरक्षण कल्याण मंडळाच्या बैठकीत करण्यात आली. विभागात तृतीयपंथीयांची संख्या ६०३ असून त्यापैकी जवळपास निम्मे लसीकरणापासून अद्याप वंचित आहेत.
तृतीयपंथी कल्याण मंडळाची बैठक गुरुवारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. करोनापासून संरक्षणासाठी प्रशासनाने सर्व घटकांच्या लसीकरणावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या स्थितीत बहुसंख्य तृतीयपंथीयांचे अद्याप लसीकरण झालेले नसल्याची बाब निदर्शनास आली. विभागात एकूण ६०३ तृतीयपंथीयांची संख्या आहे. त्यातील ३६३ तृतीयपंथीयांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती समाज कल्याण विभागात प्राप्त झाली आहे. म्हणजे २४० तृतीयपंथीयांचे अद्याप लसीकरण झालेले नाही. विभागात १२९ जणांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्र देण्यात आल्याचे या विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर यांनी सांगितले.
तृतीयपंथी व्यक्तीच्या कल्याणासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश गमे यांनी दिले. पुणे मनपा प्रशासनाने तीन हजार मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने नाशिक विभागातील महापालिकांनी विचारा करावा, असेही त्यांनी सूचित केले. यावेळी विभागीय समितीच्या सदस्य शमिना पाटील (जळगाव) यांनी तृतीयपंथीयांना येणाऱ्या अडचणी आणि सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधले.
विभागीय दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक गमे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विभागात प्रांताधिकारी यांच्या बैठका वेळेवर होत नसल्याने सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्याच्या समितीत आढावा घेण्याचे सूचित केले. या अधिनियमांतर्गत गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत घडलेल्या गुन्ह्यांचा तपशील जिल्हावार आढावा घेण्यात आला. त्या अनुषंगाने अत्याचारग्रस्तांना देण्यात आलेले अर्थसाहाय्य व उपाययोजना याबाबत सर्व यंत्रणांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रलंबित गुन्ह्यांचा तपास वेळेत पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करावे, याकामी दिरंगाई होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश गमे यांनी दिले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. भगवान वीर, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले आदी उपस्थित होते.