नाशिक : नागरिकांचे आरोग्य सदृढ आणि निरोगी राहण्यासाठी अत्याधुनिक एकात्मता धावमार्गिकेची उभारणी करण्यात आली आहे. या अत्याधुनिक धावपट्टीमुळे मालेगावच्या वैभवात नक्कीच भर पडली आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.
मालेगाव येथील पोलीस कवायत मैदानात एकात्मता धावमार्गाचा लोकार्पण सोहळा भुसे आणि आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी भुसे यांनी मार्गदर्शन केले. मालेगावकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकात्मता धावमार्ग हे एक महत्वाचे पाऊल आहे. याठिकाणी पिण्याच्या पाण्यासह बैठक व्यवस्था आणि इतर सुविधा मालेगावकरांना उपलब्ध होणार आहेत. मालेगावकरांना अभिमान वाटेल अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून मालेगावच्या विकासात येणाऱ्या काळात भर पडणार असल्याचेही भुसे यांनी सांगितले. या धावमार्गाच्या माध्यमातून विविध खेळाडूंच्या गरजा ओळखून त्यादृष्टीने कामे करण्यात येवून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असे भुसे यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतने आपल्या खडतर प्रवासाची माहिती देत इतर खळाडूंनीही प्रयत्न करुन आपल्या देशाचे नाव उज्वल करण्याचे आवाहन केले. मालेगावमध्ये अद्ययावत क्रीडा संकुल बांधण्यात आल्यास तालुक्यातील विविध खेळात पारंगत असलेल्या गरीब व होतकरु खेळाडूंना त्याचा निश्चितच लाभ होऊन मालेगावमधील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्वल करतील, असा विश्वास कविताने व्यक्त केला. नाशिकच्या धर्तीवर मालेगावात सिंथेटिक धावमार्ग उभारण्यात यावा, अशी मागणीही कविताने भुसे यांच्याकडे केली.
यावेळी व्यासपीठावर एकलहरा वीज प्रकल्पाचे उपअभियंता महेश तुंगार, डॉ. बबन गांगुर्डे, भावना निकम, कुस्तीपटू करण ठोके,
श्रध्दा पवार, नेमबाज रुद्राक्ष खैरनार हेही उपस्थित होते. याशिवाय उपमहापौर निलेश आहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे उपस्थित होते.
