धुळे – विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला आंतरराज्य टोळीतील गुन्हेगार अजय कटवाल उर्फ नेपाळी यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी नेपाळीकडून तीन लाख रुपयांची मोटार जप्त केली. अजय कटवाल उर्फ नेपाळी (रा. पुरुषोत्तम कॉलनी, नगावबारी, देवपूर, धुळे) हा शहरातील गणपती मंदिराजवळील पांझरा नदीकिनारी चारचाकी वाहनासह उभा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली.
पथकाने नेपाळी यास मोटारीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे वाहनाची कागदपत्रे मागितली असता त्याने त्याचा साथीदार आर्यन खान (रा. राणीगंज, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) याच्यासह काही दिवसांपूर्वी संगमनेर शहरातून रात्रीच्या वेळी चोरी केल्याची कबुली दिली. याबाबत पोलिसांनी माहिती घेतली असता मोटार चोरीबाबत संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समजले. पोलिसांनी नेपाळीकडून मोटारही जप्त केली आहे.
नेपाळीविरुध्द मोहाडीनगर, दोंडाईचा, चिपळूण (जि.रत्नागिरी), विश्रामबाग (सांगली), रामनगर, वर्धा, गाडगेनगर (अमरावती), नांदगाव, पेठ, अमरावती, अंबरनाथ, उल्हासनगर या पोलीस ठाण्यात तसेच मध्य प्रदेशातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, सहायक निरीक्षक संजय पाटील, हवालदार संतोष हिरे, हर्षल चौधरी, सुशिल शेंडे, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, जगदीश सूर्यवंशी, प्रशांत चौधरी, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, चेतन बोरसे, पोलीस नाईक धर्मेद्र मोहिते यांनी केली आहे.