scorecardresearch

Premium

प्रदेशाध्यक्षांच्या प्रस्तावाने इच्छुकांमध्ये धाकधूक

नाशिक येथे बंद दाराआड झालेल्या भाजपच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशी तंबी देत विद्यमान आमदारांनी किती अ‍ॅप डाऊनलोड केले, याची जाहीर पडताळणी केली.

LK chandrashekhar bawankule
प्रदेशाध्यक्षांच्या प्रस्तावाने इच्छुकांमध्ये धाकधूक

अनिकेत साठे

नाशिक : पुढील सलग १३ महिने तुम्ही दररोज तीन तास पक्षासाठी द्या..ज्याला खासदार, आमदार, नगरसेवक व्हायचे असेल त्या प्रत्येकाने किमान ६०० सरल अ‍ॅप डाऊनलोड करावेत. सर्वासमक्ष सांगतो जी व्यक्ती हे करणार नाही, त्याला उमेदवारी मिळणार नाही. नाशिक येथे बंद दाराआड झालेल्या भाजपच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशी तंबी देत विद्यमान आमदारांनी किती अ‍ॅप डाऊनलोड केले, याची जाहीर पडताळणी केली. काही ज्येष्ठ बूथप्रमुखांना काय काम केले, याची विचारणा केली. अतिशय व्यस्त दिनक्रमामुळे प्रदेशाध्यक्षांना अधिक उलट तपासणी करता आली. डिसेंबरच्या दौऱ्यात मात्र तसे घडणार नसल्याचे त्यांनीच सूचित केले. प्रदेशाध्यक्षांचा दौरा नाशिकमधील भाजप कार्यकर्त्यांची धाकधूक वाढवून गेला.

ncp leader jayant patil criticize shinde fadnavis government, ncp leader jayant patil on medicine purchase
“जीव गमवावा लागणे हे दुर्दैवी, आमच्या काळात…”, औषधे खरेदीवर जयंत पाटील म्हणाले…
jayant patil on chandrashekhar bavankule, jayant patil criticize chandrashekhar bavankule, invitation given to rahul gandhi to come baramati
“…तर बावनकुळेंना दारोदारी का फिरावे लागत आहे?”, जयंत पाटील यांचा टोला
Chandrashekhar Bawankule (1)
पत्रकारांना सांभाळण्याच्या बावनकुळेंच्या वक्तव्यावरून वाद
Ajit Pawar-Janyat Patil
जयंत पाटील यांच्या विरोधकांना अजित पवारांचे बळ

लोकसभा महाविजय अभियानांतर्गत नाशिक दौऱ्यात बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहरात स्थानिक केंद्रस्तरीय कार्यकर्त्यांची (बूथ वॉरिअर्स) बैठक, घर चलो अभियान, नागरिकांशी सुसंवाद, कामगार मेळावा असे भरगच्च कार्यक्रम पार पडले. अहमदनगर येथील पत्रकारांविषयीचे विधान चांगलेच चर्चेत आल्याने बावनकुळे यांनी नाशिकच्या बैठकीत पत्रकारांविषयी चांगलीच खबरदारी घेतली. माहिती बाहेर जाऊ नये म्हणून बूथप्रमुखांना भ्रमणध्वनी बंद करायला लावले. सभागृहातून बाहेर आवाज जाणार नाही, बैठकीत कुणी पत्रकार येणार नाही, याची चांगलीच काळजी घेतली गेली. गतवेळी प्रदेशाध्यक्षांनी अशीच आढावा बैठक भाजपच्या वसंतस्मृती या शहर कार्यालयात घेतली होती. त्यावेळी पदाधिकारी व बूथप्रमुखांच्या भ्रमणध्वनीत सरल अ‍ॅप आहे की नाही, याची पडताळणी केली होती. बूथ सशक्तीकरण अभियान म्हणजे काय, आपल्याला काय काम करायचे, याची उलट तपासणी केली होती. या अनुभवामुळे केवळ पदाधिकारी, कार्यकर्तेच नव्हे, तर खुद्द लोकप्रतिनिधींच्या चेहऱ्यावर अनामिक दडपण जाणवत होते. पुन्हा तसे काही घडेल का, अशी विचारणा काहींनी बैठकीआधी आपआपसांत केल्याचे सांगितले जाते.

 दिवसभरातील कार्यक्रमांमुळे प्रदेशाध्यक्षांना बैठकीत सव्वा तासापेक्षा अधिक वेळ देता आला नाही. त्यातही त्यांनी शक्य तितकी कसर भरून काढल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात होत आहे. शहरातील तिन्ही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. नाशिक पश्चिमचे सीमा हिरे, नाशिक मध्यचे देवयानी फरांदे आणि नाशिक पूर्वचे अ‍ॅड. राहुल ढिकले प्रतिनिधित्व करतात. संबंधितांनी मतदारसंघनिहाय किती सरल अ‍ॅप डाऊनलोड केले, याची आकडेवारी बावनकुळे यांनी घेतली. स्वत:च्या खांद्यावरील कमळाचे चिन्ह असणारा गमछा (शेला)  काढून त्यांनी तो नसल्यावर आपण कसे दिसतो आणि तो असल्यावर आपण कसे दिसतो, याची विचारणा करून पक्षाचे महत्त्व अधोरेखित केले.  पक्ष आहे म्हणून तुम्ही, आम्ही आहोत. हा गमछा असेपर्यंत किंमत आहे. तो काढला तर शून्य किंमत होते, याची जाणीव करून दिली. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी जिवापाड प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. जी – २० परिषदेत कोणता करार झाला, या प्रश्नाला एकाही पदाधिकाऱ्याला उत्तर देता न आल्याने प्रदेशाध्यक्षांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली.

दिंडोरीकडे दुर्लक्ष ?

 प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात सर्व कार्यक्रम नाशिक लोकसभा मतदारसंघात होते. भाजपच्या ताब्यात असणाऱ्या दिंडोरी मतदारसंघात एकही कार्यक्रम नव्हता. त्यामुळे या दौऱ्यातून भाजपने केवळ नाशिकवर संपूर्ण लक्ष केंद्रित केल्याचे अधोरेखित झाले. युतीत नाशिक लोकसभेची जागा अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. दोन वर्षांपूर्वी भाजपने महापालिकेतील पक्षाचे माजी सभागृह नेते  दिनकर पाटील यांना तयारी करण्यास सांगितले होते. त्यांच्याकडून तयारी सुरू असताना प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यातूनही एक प्रकारे तसेच संकेत दिले गेल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. नाशिकच्या जागेत बदल होणार का, यावर भाजप प्रदेशाध्यक्षांनी सावधपणे भूमिका मांडली. जागेसंबंधीचे सर्व निर्णय महायुतीतील प्रमुख नेत्यांकडून घेतले जातील. जागा मित्रपक्षांकडे गेली तरी त्या ठिकाणी त्यांना ताकद देणे, ही भाजपची जबाबदारी असल्याचे त्यांनी सूचित केले. पक्ष संघटन, बुथस्तरीय यंत्रणा मजबूत करून भाजप नेमके कुणाला ताकद देईल हे निवडणुकीवेळी स्पष्ट होईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Intimidation among the aspirants with the proposal of the state president chandrasekhar bawankule ysh

First published on: 28-09-2023 at 03:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×