नाशिक – ‘आयपीएल’ क्रिकेट सामन्यांच्या अंतिम थरारापूर्वीच नाशिक पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. लेखानगर परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हायटेक ऑनलाइन क्रिकेट बेटिंगचा (सट्टा) अड्डा अंबड पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी राजस्थान आणि गुजरात यांच्यातील सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या आणि चालवणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जळगावच्या तीन संशयितांचा समावेश असून, एक जण नाशिकचा रहिवासी आहे. ‘क्रिकेट लाईन गुरू’ या संकेतस्थळाचा संशयितांनी बेटींगसाठी वापर केल्याचे उघड झाले आहे.

आयपीएलच्या महाअंतिम सामन्यासाठी या हॉटेलमध्ये सट्टेबाजीची मोठी तयारी सुरू होती. मात्र, अंतिम सामन्यातील सट्टेबाजीचा कट पोलिसांनी त्याआधीच्या सामन्याच्या वेळीच छापा टाकून उधळून लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी रात्री १०:२८ वाजेच्या सुमारास अंबड पोलिसांच्या पथकाने लेखानगर येथील हॉटेलमधील रूम क्रमांक १०४ वर अचानक छापा टाकला. ही कारवाई ३० मे रोजी पहाटे दोन वाजेपर्यंत सुरू होती. या कारवाईत नावाजलेले बुकी पोलिसांच्या जाळ्यात सापडले. संशयितांनी सिमकार्डचा गैरवापर केल्याचे समोर आले. या छाप्यात अटक करण्यात आलेल्यांमध्ये योगेश प्रदीप महाजन (वय ३१, जळगाव), सागर नवल तायडे (वय ३३, जळगाव) सत्यम रघुनाथ भोई (वय ३९, जळगाव) आणि विनायक लक्ष्मण जाधव (वय ३९, सिडको, नाशिक) यांचा समावेश आहे.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पकडलेल्या चार मुख्य संशयितांसह सट्टा खेळणारे १० ग्राहक आणि संबंधित संकेतस्थळाच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी मोबाईलची सीमकार्ड कुणाकडून मिळवली, नाशिक व जळगावमधील आणखी कोण सट्टेबाजीच्या रॅकेटमध्ये होते यासह या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्यीय स्तरावर असण्याची शक्यता असून, अंबड पोलीस पुढील तपास करत आहेत. शहर परिसरातील हॉटेल्समध्ये अशा बेकायदेशीर गोष्टी सुरू असल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सीमकार्डचा गैरवापर

प्राथमिक तपासात संशयितांनी संगनमत करून ‘क्रिकेट लाईन गुरू’ या संकेतस्थळाचा बेटींगसाठी वापर केल्याचे निष्पन्न झाले. ते मोबाईलद्वारे तब्बल १३ मोठ्या ग्राहकांच्या (सट्टेबाज) थेट संपर्कात होते आणि क्रिकेट सट्टा चालवत होते. धक्कादायक बाब म्हणजे, ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी वापरण्यात आलेली काही सिमकार्ड ही इतर निष्पाप व्यक्तींच्या कागदपत्रांचा गैरवापर करून मिळवल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. राजस्थान व गुजरात या दोन संघाच्या सामन्यांवर बोली लावून कोट्यवधींची उलाढाल केली जात होती. पोलिसांनी घटनास्थळावरून विविध कंपन्यांचे नऊ मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि सट्टेबाजीचे इतर साहित्य जप्त केले आहे. या जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत दोन लाख ८३ हजार ५० रुपये आहे.