जळगाव : जिल्ह्यात लाचखोरीची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत असताना, गिरणा नदीत पकडलेले वाळूने भरलेले ट्रॅक्टर सोडण्यासाठी सुमारे ३० हजाराची लाच स्वीकारताना एरंडोल तालुक्यातील दोन तलाठ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी केली. या प्रकरणी दोघांविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
नरेश भास्कर शिरूड (४१, तलाठी सजा उत्राण अहीर हद्द, ता. एरंडोल) आणि शिवाजी एकनाथ घोलप (४६, तलाठी सजा उत्राण गुजर हद्द, ता. एरंडोल), अशी वाळूचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी सुमारे ३० हजाराची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहे. दोघांच्या विरोधात जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या तक्रारीवरून कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर २७ जानेवारी रोजी उत्राण येथील गिरणा नदी पात्रात सकाळी तलाठी नरेश शिरूड यांनी पकडले होते. सदरचे ट्रॅक्टर नंतर सोडूनही दिले होते. मात्र, वाळूने भरलेले सोडून दिले आणि कोणतीही कारवाई केली नाही म्हणून तलाठी नरेश शिरूड यांनी सुमारे २५ हजार रूपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती.
परंतु, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी पंचांसमक्ष पडताळणी केली असता, तलाठी शिरूड यांनी तक्रारदाराचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडल्यानंतर ते सोडून देण्याच्या मोबदल्यात आणि कारवाई न करण्यासाठी ठरल्या प्रमाणे २५ हजार रूपये लाच घेण्यास नकार दिला. इतरांकडून जास्त पैसे घेतो, तू गरीब आहे म्हणून तुझ्याकडून ३० हजार रूपये घेत आहे, असे सांगून तेवढ्या रकमेच्या लाचेची मागणी केली. या दरम्यान, दुसरे तलाठी शिवाजी घोलप यांनी लाचेची रक्कम देण्यास प्रोत्साहन दिल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.
लाच मागणी पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लागलीच सापळा कारवाई आजमावली असता, ग्रामपंचायत कार्यालयावरील एका खोलीत तलाठी शिवाजी घोलप यांनी तलाठी नरेश शिरूड यांच्या उपस्थितीत सुमारे ३० हजार रूपये लाचेची रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारली. त्याचवेळी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहाथ पकडले. कारवाई दरम्यान तलाठी नरेश शिरूड यांच्या ताब्यातून एक लाख ७३ हजार ३०० रूपये रोख रक्कम, २९५० रूपये किमतीची ७५० मिली व्हिस्कीची बाटली आणि भ्रमणध्वनी, असा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, सापळा पथकातील निरीक्षक हेमंत नागरे तसेच प्रदीप पोळ, अमोल सुर्यवंशी, सचिन चाटे यांनी यशस्वी केली.
