जळगाव : शहरातील मूळ रहिवासी आणि सध्या अकोला येथे मुद्रांक जिल्हाधिकारी असलेले किरण चौधरी यांच्याविरोधात लाचखोरीप्रकरणी सुरू असलेल्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. नाशिक आणि जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) संयुक्त पथकाने जळगाव शहरातील त्यांच्या सीलबंद निवासस्थानाची ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती घेतली. अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडलेल्या या कारवाईत सोने, चांदी, रोख रक्कम, असे कोट्यवधीचे घबाड तसेच काही महत्त्वाचे दस्तऐवज हाती लागल्याची माहिती मिळाली आहे.

किरण चौधरी यांच्यावर काही दिवसांपूर्वी लाचखोरीप्रकरणी अकोला येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यानंतर जळगाव शहरातील साईप्रभा आर्केड अपार्टमेंटमधील त्यांचे निवासस्थान सील करण्यात आले होते. या कारवाईनंतर प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असतानाच सीलबंद घरात घुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणात चौधरी यांच्या दोन नातेवाईकांनी सील असलेल्या घरात प्रवेश करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. जिल्हापेठ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर चौधरी यांचे घर पुन्हा सील करून तेथे पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

एसीबीकडून गोपनीय पद्धतीने झाडाझडती

दरम्यान, गुरुवारी दुपारनंतर नाशिक आणि जळगाव येथील एसीबीच्या अधिकाऱ्यांचे विशेष पथक साईप्रभा आर्केड येथे दाखल झाले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सीलबंद घर उघडून ‘इन-कॅमेरा’ झाडाझडतीला सुरुवात केली. या संपूर्ण कारवाईदरम्यान बाहेरील व्यक्तींना प्रवेश देण्यात आला नाही. घरातील प्रत्येक खोली, कपाटे, लॉकर, कागदपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांची बारकाईने तपासणी करण्यात आली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी घराचा कानाकोपरा तपासून सोने, चांदी, रोख रक्कम, आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आणि इतर महत्त्वाचे साहित्य ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशील

एसीबीच्या माहितीनुसार, मुद्रांक जिल्हाधिकारी चौधरी यांच्या जळगावमधील घरातून सुमारे १,५३,८४,६३० रुपये इतकी रोकड जप्त करण्यात आली. याशिवाय ६०,५७,१३५ रुपये किमतीचे ४२२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३१,४१६ रुपये किमतीचे चांदीचे दागिने, ६२,१३,३७६ रुपये किमतीचे स्वतः व नातेवाईकांच्या नावावरील मालमत्तेची कागदपत्रे, ११,५२,७४५ रुपये किमतीच्या सोने खरेदीच्या पावत्या तसेच ६,२५,५४५ रुपये किमतीच्या घरगुती वस्तू जप्त करण्यात आल्या. अशा प्रकारे एकूण २,९४,६४,८४७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.