जळगाव : जिल्ह्यातील यावल–किनगाव रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या भरधाव मोटारीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात भरत कोळी या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, यावल पोलिसांनी पुढील तपासाला गती दिली आहे.

भरत कोळी हे रविवारी रात्री त्यांच्या दुचाकीने यावल येथून कर्तव्य बजावून किनगावमार्गे आपल्या राहत्या गावी विदगाव येथे परत येत होते. यावल ते किनगाव दरम्यान हॉटेल मनमंदिरजवळून जात असताना अचानक मागून आलेल्या भरधाव प्रवासी मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत भरत कोळी हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते.

मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी प्रवीण कोळी यांच्या तक्रारीवरून प्रवासी मोटारीचे चालक दीपक प्रकाश सपकाळे (रा. आडगाव) याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक किशोर परदेशी पुढील तपास करीत आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेले पोलीस कर्मचारी भरत कोळी यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी विदगाव (ता. जळगाव) येथे त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, अनिल बडगुजर, यावलचे निरीक्षक रंगनाथ धारबळे आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हा मुख्यालयातील मानवंदना पथकाने हवेत फैरी झाडून कोळी यांना अखेरची सलामी दिली.

पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांची बदली

राज्याच्या गृह विभागाने पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल केले असून, जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुणे येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे पदभार सांभाळणार आहेत. डॉ. रेड्डी यांची पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नवनियुक्त पोलीस अधीक्षक धिवरे यांच्यावर जळगाव जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सांभाळण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. अलीकडे जिल्ह्यात पोलीस कर्मचारी लाच प्रकरणात अडकल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. अशा स्थितीत मोठी जबाबदारी धिवरे यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे.