जळगाव : जिल्ह्यात एकाच दिवशी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी संपूर्ण जिल्हा हळहळला आहे. बुधवारी दुपारी शहरात भरधाव टँकरच्या धडकेत एका महिला भाजी विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सायंकाळी शिरसोलीजवळील चंभारदरी पाझर तलावात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर रात्री नशिराबाद टोलनाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका मजूराचा जागीच जीव गेला. अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या या तिन्ही घटनांमुळे जिल्हाभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

जळगाव शहरातील हनुमान नगर परिसरात राहणारा ऋषिकेश उत्तम कचरे (२८) हा बुधवारी सायंकाळी काही मित्रांसह शिरसोलीजवळील शामाफायर कारखान्याच्या पाठीमागे असलेल्या चंभारदरी पाझर तलाव परिसरात पार्टीसाठी गेला होता. परिसरात फिरत असताना ऋषिकेशने आपल्याला पोहता येत असल्याचे सांगत तलावात उतरायचा निर्णय घेतला. मात्र, तलावातील पाण्याची खोली आणि तळाचा अंदाज न आल्याने काही अंतर गेल्यानंतर तो अचानक पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा करत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. काहींनी तलावात उड्या मारल्या, तर काहींनी मदतीसाठी परिसरातील नागरिकांना बोलावले. मात्र, पाण्याची खोली जास्त असल्याने त्याला बाहेर काढण्यात अपयश आले.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी चेतन पाटील, धनराज गुळवे तसेच शिरसोलीचे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पट्टीच्या तीन पोहणाऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. काही वेळाने ऋषिकेशला पाण्याबाहेर काढून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ऋषिकेश हा रोजंदारीवर हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याचा दीड वर्षांपूर्वीच विवाह झाला होता.ट

टोलनाक्याजवळील अपघातात मजूराचा मृत्यू

दुसरी दुर्घटना नशिराबाद शहरालगत टोलनाक्यासमोर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास उशिरा घडली. या भीषण अपघातात सोनू रामा बागले (२९, रा. भवानी नगर, नशिराबाद) याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सोनू बागले साकेगाव येथे दिवसभर बांधकाम मजुरी करून पिकअप वाहनाने घरी परतत होता. टोलनाक्याजवळ पोहोचताच मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॉलाने पिकअपला जोरदार धडक दिली. धडक इतकी प्रचंड होती की सोनू पिकअपमधून रस्त्यावर फेकला गेला. त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. सोनू बांधकामावर मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.

भाजी विक्रेत्या महिलेचाही अपघाती मृत्यू

दरम्यान, बुधवारी दुपारच्या सुमारास जळगाव शहरातील जुन्या महामार्गावर आणखी एक दुर्दैवी घटना घडली होती. दुचाकीवर आपल्या मुलासोबत जात असलेल्या मंगला माळी या भाजी विक्रेत्या महिलेला भरधाव टँकरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने शहरात शोककळा पसरली होती. त्यानंतर सायंकाळी आणखी दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने दुःखात भर पडली.

एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तीन जीव गेल्याने जळगाव जिल्हा हादरला आहे. तिन्ही घटनांमुळे जिल्हाभरातून हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.