जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात मंगरूळ गावाजवळ मंगळवारी सकाळी घडलेल्या भीषण तिहेरी अपघातात गुजरातमधील एका कुटुंबातील पाच जणांसह स्थानिक दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. कार, दुचाकी आणि राज्य परिवहन महामंडळाची बस यांच्यात झालेल्या धडकेत विशेषतः कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की आतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ आणि बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली.

अमळनेर येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी येताना मृत्यूमुखी पडलेले कारमधील सर्वजण गुजरात राज्यातील व्यारा येथील रहिवासी आहेत. आनंदाच्या क्षणांसाठी निघालेल्या या कुटुंबावर नियतीने काळाचा घाला घातल्याने दोन्ही राज्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, मंगरूळ गावाजवळ भरधाव वेगातील कार, दुचाकी आणि एसटीची बस यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला.

धडकेचा आवाज परिसरात मोठ्या प्रमाणावर घुमल्याने ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता मदतकार्य सुरू केले. काही जखमींना तातडीने वाहनांमधून बाहेर काढण्यात यश आले, तर एका लहान मुलाला कारच्या आतून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले.

घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवी पाटील तसेच मंगरूळचे पोलीस पाटील भागवत पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरात वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सांभाळत बचावकार्याला गती दिली. १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना त्वरित उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले.

अपघातात एसटी बसमधील दीपक दिलीप पाटील हे प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. अपघाताचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून बराच वेळ सुरु होते.

मृतांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली असून, गुजरातमधून त्यांचे कुटुंबीय अमळनेरकडे रवाना झाले आहेत. साखरपुड्याच्या आनंदोत्सवासाठी निघालेल्या कुटुंबावर आलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे व्यारा परिसरातही शोककळा पसरली आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

वाहनांचा वेग, रस्त्यावरील परिस्थिती आणि अपघाताच्या वेळी घडलेल्या घटनाक्रमाचा तपशील तपासला जात आहे. या भीषण अपघाताने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षित वाहनचालना आणि वाहतूक नियमांच्या काटेकोर पालनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंगरूळ परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्तांना दिलेली तत्पर मदत आणि बचावकार्यात दाखविलेली मानवता सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत असली, तरी एका कुटुंबातील पाच जणांचा झालेला दुर्दैवी मृत्यू संपूर्ण परिसराला चटका लावून गेला आहे.