जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात दुधातील फॅटचे प्रमाण कृत्रिमरीत्या वाढविण्यासाठी सोयाबीन तेलासह विविध रासायनिक घटकांचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि अमळनेर पोलिसांनी रविवारी दुपारी कारवाई केली. जानवे येथील इंदपिंप्री रस्त्यालगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या या गोरखधंद्यावर छापा टाकून पोलिसांनी संशयित महेश दिलीप पाटील (२७) याला रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जानवे परिसरात भेसळयुक्त दूध तयार केले जात असल्याची गुप्त माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली होती. माहितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी जळगाव येथील अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आकाश बोराडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस आणि एफडीएच्या पथकाने संयुक्तरीत्या कारवाईचे नियोजन केले. त्यानुसार रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पथकाने जानवे-इंदपिंप्री रस्त्यावरील संशयित ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी महेश पाटील हा मिक्सरच्या साहाय्याने सोयाबीन तेल आणि इतर घटक मिसळून कृत्रिमरीत्या भेसळयुक्त दूध तयार करताना आढळून आला.
अशी सुरु होती दुधाची भेसळ
प्राथमिक चौकशीत संशयिताने दिलेल्या माहितीनुसार, तो सुमारे १० लिटर कृत्रिम भेसळयुक्त दूध तयार करून ते तब्बल १०० लिटर नैसर्गिक गायीच्या दुधात मिसळत होता. या प्रक्रियेमुळे दुधातील फॅटचे प्रमाण वाढल्याचे भासवून ते पुढील विक्रीसाठी वापरले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, तयार करण्यात येणारे हे भेसळयुक्त दूध पुढील विक्रीसाठी धुळे शहराकडे पाठविले जात असल्याची माहितीही चौकशीत समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती केवळ जानवे गावापुरती मर्यादित आहे की आणखी मोठे जाळे कार्यरत आहे, याचा तपास आता यंत्रणांकडून केला जात आहे.
सव्वाचार हजाराचा मुद्देमाल जप्त
छाप्यादरम्यान पोलीस आणि एफडीएच्या पथकाने घटनास्थळाची तपासणी करून भेसळीसाठी वापरले जाणारे सव्वाचार रुपये किमतीचे विविध साहित्य जप्त केले. यात मिक्सर, सोयाबीन तेल, लोखंडी कॅन, गायीचे दूध तसेच दूध भेसळीसाठी वापरले जाणारे इतर साहित्य आणि घटकांचा समावेश आहे. या साहित्याच्या तपासणीसह दुधाचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. तपासणी अहवालातून भेसळीत नेमके कोणते घटक वापरण्यात आले होते. आणि त्याचा आरोग्यावर किती परिणाम होऊ शकतो, याबाबत अधिक स्पष्टता मिळणार आहे.
अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा
अन्न सुरक्षा अधिकारी आकाश बोराडे यांच्या तक्रारीवरून संशयित महेश पाटील याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम २६ (१), २७ (३), ३१ (१), ३१ (२) व ५९ तसेच भारतीय न्याय संहितेतील (बीएनएस) कलम २७४, २७५, १२३ आणि ३१८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न पदार्थांमध्ये अशा प्रकारे भेसळ करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा या कारवाईमुळे मिळाला आहे. दरम्यान, या प्रकरणामागे आणखी कोणी सहभागी आहे का, भेसळयुक्त दूध कोणकोणत्या ठिकाणी पाठविले जात होते आणि या माध्यमातून किती काळापासून हा प्रकार सुरू होता, याचा तपास सुरू आहे.
संयुक्त पथकाची धडक कारवाई
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आकाश बोराडे, ऋषभ चव्हाण तसेच अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पीएसआय नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील, सुनील तेली, विनोद संदानशीव, नितीन मनोरे, निलेश मोरे आणि सागर साळुंखे यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.
