जळगाव : शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडविण्यासाठी महानगरपालिकेने ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत वॉटर मीटर बसविण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. येत्या १५ दिवसांत पहिल्या टप्प्यातील ५० हजार वॉटर मीटर शहरात दाखल होणार असून, प्राथमिक तयारी पूर्ण झालेल्या प्रभागांमध्ये मीटर बसवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे आता ‘जितका वापर, तितके बिल’ ही पद्धत लागू होणार असल्याने विनाकारण नळ सुरू ठेवणाऱ्यांना मोठे बिल भरण्याची वेळ येऊ शकते.

महापौर दीपमाला काळे यांनी अमृत योजनेची कामे पूर्ण झालेल्या प्रभागांत एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्याचे निर्देश महानगपालिका प्रशासनाना नुकतेच दिले. त्यानंतर आता अमृत २.० योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यात आली आहे. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉटर मीटर बसवण्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, सर्वेक्षणाचे कामही पूर्णत्वास गेले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मुंबईस्थित ‘खिलारी इन्फ्रास्ट्रक्चर’ आणि ‘ई लिंक जे.व्ही.’ या दोन कंपन्यांना संयुक्तरीत्या कार्यादेश देण्यात आला आहे. प्रभागनिहाय नळ जोडण्यांची संख्या निश्चित करण्यात आली असून, संबंधित एजन्सींना २४ महिन्यांत संपूर्ण काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ५० हजार वॉटर मीटर बसवले जाणार असून, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी ४० हजार मीटर बसवण्याचे उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे एकूण ९० हजार घरांमध्ये डिजिटल वॉटर मीटर बसवले जाणार आहेत. या प्रणालीमुळे प्रत्येक घरातील पाण्याच्या वापराची अचूक नोंद ठेवली जाणार आहे.

१५० कोटींचा निधी; नवीन जलवाहिनी

या योजनेसाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकार, राज्य शासन आणि महानगरपालिका अशा तिन्ही स्तरांवरून निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, एकूण खर्चात महापालिकेचा ३० टक्के आर्थिक सहभाग असणार आहे. या निधीतून केवळ वॉटर मीटर बसवले जाणार नाहीत, तर वाघूर धरण ते उमाळा जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान नवीन व मोठ्या क्षमतेची जलवाहिनी टाकली जाणार आहे. या नव्या जलवाहिनीमुळे पाणी पुरवठ्याचा दाब वाढेल आणि गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तसेच जलशुद्धीकरण केंद्रांवरील जुनी मशिनरी बदलून अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा बसवण्याचे नियोजन आहे.

पाणी वापरावर येणार नियंत्रण

नवीन वॉटर मीटर प्रणालीमुळे जळगाव शहरातील नागरिकांना वापरानुसार बिल भरावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला पाणी जपून वापरण्याची सवय लागेल. आणि पाण्याच्या अपव्ययाला आळा बसेल, असा महानगरपालिकेच्या प्रशासनाला विश्वास आहे. आतापर्यंत अंदाजित दराने आकारण्यात येणारे पाणी पट्टीचे बिल यापुढे प्रत्यक्ष वापरावर आधारित असेल. तांत्रिक अडचणी, गळती, कमी दाबाचा पुरवठा अशा समस्या दूर करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सक्षम केली जाणार आहे. परिणामी भविष्यात नियमित, वेळेवर आणि दाबाने पाणी पुरवठा करण्यास मोठी मदत होणार आहे.

नागरिकांना सहकार्याचे आवाहन

महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना पाणी बचतीबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. वॉटर मीटर बसवताना सहकार्य करण्याचे आणि नळ जोडणीतील अनियमितता टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येत्या काळात पाणी पुरवठा व्यवस्थेत पारदर्शकता आणि शिस्त निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एकूणच, अमृत २.० योजनेअंतर्गत राबवण्यात येणारा हा प्रकल्प जळगाव शहराच्या पाणी व्यवस्थापनात महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, दीर्घकालीन दृष्टीने शाश्वत आणि कार्यक्षम पाणी पुरवठ्याची पायाभरणी करणार आहे.