जळगाव : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी पहिल्यांदा रब्बी हंगामातील नवीन गव्हाची आवक सुरु झाली. वर्षभरासाठी दर्जेदार गहू साठवून ठेवण्याची परंपरा लक्षात घेता ग्राहकांनी पहिल्याच दिवशी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. पहाटेपासूनच बाजार समितीच्या आवारात त्यामुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
बाजार समितीत सध्या गव्हाची आवक तुलनेने कमी प्रमाणात असली, तरी ग्रामीण भागात काढणीचा वेग वाढत असल्याने पुढील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात गहू दाखल होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मर्यादित गहू बाजारात येत आहे; मात्र, काढणीला वेग आल्यानंतर आवक झपाट्याने वाढेल. बाजारात हंगामाच्या सुरूवातीला येणारा गहू प्रामुख्याने ‘लोकवन’ या प्रकारातील असून तो स्थानिक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला आहे. लोकवन गव्हाची चकाकी, चव आणि दळणानंतर मिळणाऱ्या पिठाची गुणवत्ता चांगली राहत असल्यामुळे ग्राहकांकडून त्यास बऱ्यापैकी मागणी आहे. घरगुती वापरासाठी तसेच वर्षभर साठवणीसाठी हा गहू योग्य मानला जातो. त्यामुळे किरकोळ व्यापारी, घाऊक विक्रेते आणि सर्वसामान्य ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचे दिसून येते.
बाजार समितीत सध्या अशी आवक
बाजार समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी गव्हाची २० क्विंटलपर्यंत आवक झाली. आणि त्यास सरासरी २१२५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. याशिवाय दादर ज्वारीची ३६० क्विंटल आवक होऊन २६०० ते ४२०५, सरासरी ३९०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तुरीची ५८ क्विंटल आवक होऊन ६८९५ ते ७५००, सरासरी ७००५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. हरभऱ्याच्या चाफा वाणाची ३५८ क्विंटल आवक होऊन त्यास ४७०० ते ५१५५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. गुलाबी वाणाची ८० क्विंटल आवक होऊन त्यास ४८६० ते ६०२५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. गुल्लर वाणाची ५० क्विंटल आवक होऊन त्यास ६३०० ते ६७८० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. चिणोली वाणाची १११ क्विंटल आवक होऊन त्यास ५१०० ते ६८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. पीकेव्ही २ वाणाची १२ क्विंटल आवक होऊन त्यास सरासरी ५४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. हरभऱ्याच्या मेक्सिको वाणाची २० क्विंटल आवक होऊन त्यास सरासरी ७९५५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
गव्हाचे दर पुढे कसे राहतील?
आठवडाभरात रब्बी हंगामातील नव्या गव्हाची आवक लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता आहे. सध्या अनेक भागांत काढणीला सुरुवात झाली असून, हवामान अनुकूल राहिल्यास शेतकरी मोठ्या प्रमाणावर गहू बाजारात आणतील. पुरवठा वाढल्याने बाजारातील व्यवहाराला अधिक वेग येईल. सुरुवातीच्या टप्प्यात गव्हाची मर्यादित आवक असल्यामुळे दर स्थिर आणि समाधानकारक पातळीवर आहेत; मात्र, पुढील काळात आवक झपाट्याने वाढल्यास दरात काही प्रमाणात चढ-उतार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापारी वर्गाच्या मते, मागणीचा वेग कायम राहिला तर गव्हाचे दर टिकून राहतील; परंतु, पुरवठा अचानक वाढल्यास दरांवर दबाव येऊ शकतो. चांगल्या प्रतीच्या गव्हाला सध्या बाजारात बऱ्यापैकी भाव मिळत आहे. किरकोळ व्यापारी आणि साठवणूकदारांकडून वर्षभरासाठी खरेदी केली जात असल्याने मागणीचा पाया भक्कम आहे.
