जळगाव : केळीला गेल्या अनेक दिवसांपासून चांगले भाव नसल्याने शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान सोसावे लागत आहे. जिल्ह्यात तब्बल चार मंत्री असतानाही कोणीच लक्ष देण्यास तयार नाही. या पार्श्वभूमीवर, संतप्त केळी उत्पादकांनी शनिवारी किनोद (ता. जळगाव) येथे जनआक्रोश मोर्चा काढून शासनासह लोकप्रतिनिधींचा तीव्र निषेध केला.

केळीला उत्पादन खर्चाच्या तुलनेत समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत केळीच्या दरात काही प्रमाणात स्थिरता होती; मात्र जूनपासून भाव घसरत गेले. सध्या बाजार समित्यांकडून जाहीर होणारे भाव केवळ नावापुरते राहिले आहेत. व्यापारी प्रत्यक्ष व्यवहारात त्या दरापेक्षा खूपच कमी म्हणजे निम्म्यापेक्षा कमी भाव देत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. बाजारात केळीला चांगली मागणी असतानाही व्यापाऱ्यांची मनमानी सुरूच असून, शेतकऱ्यांचे नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे. व्यापारी सध्या केळीचा उठाव कमी असल्याचे सांगून कमीत कमी दरात केळीची खरेदी करीत आहेत. याचा फटका जिल्ह्यातील हजारो केळी उत्पादकांना बसला आहे. रावेर, यावल, मुक्ताईनगर आणि इतर काही तालुक्यांमधील मृग बाग केळीची काढणी जवळपास आटोपली आहे. त्यानंतर आता चोपडा, जामनेर, जळगाव या तालुक्यातील कांदेबाग केळीची काढणी सुरू झाली आहे. परंतु, व्यापारी दर्जेदार केळीला जेमतेम ३०० ते ४०० रूपये प्रति क्विंटलचा भाव देत आहेत.

ही स्थिती लक्षात घेऊन जळगाव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी शनिवारी किनोद येथे जनआक्रोश मोर्चा काढला. कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापारी आणि शेतकऱ्यांना सोबत घेऊन केळीचे भाव स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये शेतकऱ्यांसाठी १० टक्के निधी राखीव ठेवावा. दलालांकडून होणारी केळी उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी, या काही मागण्यांकडे मोर्चात सहभागी केळी उत्पादकांनी लक्ष वेधले. बाजारात आज भंगार ४० रूपये किलो प्रमाणे विकले जात आहे. मात्र, शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून बाजारात आणलेली केळी तीन ते चार रूपये किलोच्या भावाने व्यापारी खरेदी करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे योग्य मोल न मिळाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रमोद घुगे, मनसेचे प्रदीप पाटील, किरण सोनवणे, सुनील सोनवणे, शैलेश चौधरी, शेतकरी नेते राजेंद्र नवाल, भाऊसाहेब पाटील, नांद्रा बुद्रुकचे माजी सरपंच शांताराम पाटील, गोपाल पाटील, अशोक पाटील, प्रभाकर कोळी, लोटन सोनवणे, धनराज वारडे, सुकदेव बाविस्कर, किनोदचे भैय्या पाटील, भगवान धनगर, विजू सपकाळे, अनिल सपकाळे, जगन्नाथ पाटील, योगेश पाटील, नितीन पाटील तसेच भोकर, भादली खुर्द, कठोरा, फुपनी, नांद्रा बुद्रुक, फेसर्डी, नंदगाव, देवगाव, गाढोदा, जामोद, पळसोद, कानळदा, पिलखेडा, करंज, धानोरा, सावखेडा भागातील शेतकरी उपस्थित होते.