मालेगाव : मालेगाव व बागलाण तालुक्याला गेल्या दोन दिवसात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. बुधवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसांनंतर गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही या परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. शेती पिकांना वाजवी दर मिळत नसल्याने बळीराजा आधीच हवालदिल झाला असताना वादळी वारे आणि गारांसह झालेल्या या अवकाळीमुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे.
बागलाणच्या पश्चिम पट्टयातील मुल्हेर,साल्हेर,बोरदैवत,हरणबारी आणि ताहाराबाद भागात बुधवारी पावसाने थैमान घातले होते. काही दिवस उन्हाच्या तडाखा बसल्यानंतर वातावरणात अचानक बदल झाला. आकाशात पावसाळ्यासारखे ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह गारांचा वर्षाव सुरू झाला. दुसऱ्या दिवशी गुरुवारी बागलाण व मालेगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी पुन्हा पावसाने झोडपून काढले. सायंकाळच्या सुमारास वादळी वारे,विजांचा कडकडाटास अर्धा ते एक तास पाऊस झाला.बागलाण तालुक्यातील नांदीण,दरेगाव,जायखेडा,सुराणे, वायगाव तसेच मालेगाव तालुक्यातील रावळगाव, पिंपळगाव दाभाडी,सातमाने,कोठरे, वडनेर- खाकुर्डी भागात जोरदार गारपीट झाली.
या अस्मानी संकटामुळे काढणीला आलेला कांदा,गहू,हरभरा यासारख्या पिकाचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी गव्हाची काढणी सुरू असतानाच पाऊस आल्याने कापून ठेवलेला शेतमाल भिजला आहे. बागलाण व मालेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर उन्हाळ कांद्याची लागवड केली जाते. मात्र, गारांच्या मारामुळे कांद्याची पात तुटल्याने कांद्याच्या वाढीवर तसेच साठवणूक क्षमतेवर परिणाम होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मोसम खोऱ्यात आंब्याची मोठी झाडे आहेत. अक्षय्य तृतीयेच्या सुमारास ही आंब्याची फळे बाजारात येत असतात. मात्र गारपीट व वादळामुळे काही ठिकाणी आंब्यांच्या झाडांवरील फळगळ झाली. याशिवाय द्राक्ष, डाळिंब या फळ पिकांनाही अवकाळीचा फटका बसला आहे. डाळिंब झाडांवरील मोठ्या प्रमाणावर फुलगळ झाली. तसेच फळांना मार लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी व पाऊस लांबल्यामुळे मका,बाजरी,कापुस यासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. तेव्हा रब्बी हंगामात तरी काही हाती लागेल या आशेने महागडी खते आणि औषधे वापरून गहू-कांदा अशी पिके शेतकऱ्यांनी जगवली होती. याशिवाय मजुरीचे दर वाढल्याने उत्पादन खर्च कमालीचा वाढला आहे. अशा स्थितीत रब्बी हंगामात दोन पैसे हाती लागतील,या आशेवर निसर्गाने पुन्हा पाणी फेरले,अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपली व्यथा बोलून दाखवली. शासनाने या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून मदतीचा हात द्यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
