जळगाव : मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बऱ्याच महिन्यांनी केळीला समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसत आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी १७५१ रूपयांपर्यंत पोहचलेल्या केळीने आणखी पुन्हा मोठी झेप आता घेतली असून, संबंधित सर्व शेतकऱ्यांच्या आशा त्यामुळे पल्लवित झाल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यासह लगतच्या सीमावर्ती भागातून सध्या लवकर लागवड झालेल्या मृग बहर बागा तसेच पिलबाग केळीची बाजारात आवक सुरू झाली आहे. यंदा काही शेतकऱ्यांनी अनुकूल हवामानाच्या अपेक्षेने लवकर लागवड केली होती. त्या बागांमधील केळी आता टप्प्याटप्प्याने काढणीस येत असून, स्थानिक बाजारपेठांसह बाहेरील राज्यांतही माल पाठविला जात आहे. यासोबतच उशिरा लागवड करण्यात आलेल्या कांदेबाग केळीचीही काढणी हळूहळू सुरू झाली आहे.

रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर आदी केळी उत्पादक तालुक्यांतून दररोज मोठ्या प्रमाणात केळी बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे आवक वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून थंडीचा प्रभाव कायम असल्याने काढणीचा वेग अपेक्षेइतका वाढलेला नाही. शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, अनेक बागांतील केळीचे घड थंड हवामानामुळे पूर्णपणे विकसित होण्यासाठी अधिक कालावधी घेत आहेत. तापमानात हळूहळू वाढ झाल्यानंतर केळी पक्व होण्याची प्रक्रिया वेग घेईल.

थंडीचा पारा कमी झाल्यानंतर घडांची वाढ जलद होऊन काढणी सुरळीत सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बाजारातील आवक लक्षणीयरीत्या वाढेल आणि दरांवरही त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या दरम्यान, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या केळीची आवक तुलनेने कमी आहे. दररोज सरासरी १४ ते १५ गाड्या (प्रत्येकी सुमारे ८ ते १० टन क्षमता) बाजारात दाखल होत आहेत.

बऱ्हाणपुरात प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर तसेच परिसरातील भागांतून मोठ्या प्रमाणात केळी येत असते. सध्या आवक मर्यादित असल्याने बाजारातील केळीचे दर चांगले सुधारले आहेत. आवक वाढेपर्यंत दरात मोठी घसरण होण्याची शक्यता नसल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. तापमानात वाढ झाल्यानंतर काढणी वेग घेऊन बाजारातील आवक वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र वाढत्या आवकेचा दरांवर नेमका काय परिणाम होतो, याकडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बऱ्हाणपुरात आता किती भाव?

बऱ्हाणपूर बाजार समितीत केळीला १७ जानेवारी रोजी कमाल १६०० रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला होता. त्यानंतर सहा फेब्रुवारीपर्यंत कमी-अधिक फरकाने केळीला बऱ्यापैकी भाव मिळाला. तर सात फेब्रुवारीला कमाल १७५१ रूपयांचा भाव मिळाल्याचे दिसून आले. त्यानंतर सातत्याने भाववाढ झाल्याने ११ फेब्रुवारीपर्यंत केळीचे भाव २०११ रूपये प्रति क्विंटल झाले.

चार दिवसातच २६० रूपयांची वाढ केळी भावात झाली असली, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडे मात्र सध्या काढणी योग्य मालाची कमतरता आहे. मागणीनुसार आवक नसल्यामुळे बाजारात केळीचा तुटवडा निर्माण झाला असून, व्यापाऱ्यांना भाव वाढविण्याशिवाय दुसरा पर्याय आता उरलेला नाही. केळी भावात झालेली ही समाधानकारक वाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे.