जळगाव : जिल्ह्यातील केळी उत्पादकांना पुन्हा एकदा दर घसरणीचा मोठा फटका बसला आहे. बऱ्हाणपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत २० फेब्रुवारी रोजी केळीला कमाल २२११ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. मात्र, त्यानंतर अवघ्या १०-१२ दिवसांतच परिस्थिती पूर्णपणे बदलली असून, दोन मार्च रोजी तर केळीचा कमाल दर १६२५ रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आला होता. उत्पादन कमी असतानाही दर घसरल्याने संबंधित शेतकरी पुरते हतबल झाले आहेत.
सध्या जळगाव जिल्ह्यातील रावेरसह, मुक्ताईनगर, यावल, चोपडा, जामनेर या काही तालुक्यांत काढणीयोग्य केळीच्या मालाची कमतरता आहे. अनेक भागांत हवामानातील बदल, पाणी टंचाई आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरम्यान, बाजारात आवक मर्यादित असतानाही दरात घसरण होत असल्याने केळी उत्पादक शेतकरी संभ्रमात आहेत.
उत्पादन कमी असताना दर वाढण्याची अपेक्षा असते; प्रत्यक्षात उलट चित्र दिसत आहे. केळी लागवडीसाठी प्रति एकरी मोठा खर्च येतो. टिश्युकल्चर रोपे, ठिबक सिंचन संच, रासायनिक खते, कीडनाशके, मजुरी, काढणी व वाहतूक या सर्व खर्चाचा विचार करता सध्याचे दर परवडणारे नसल्याचे शेतकरी सांगतात. काही शेतकऱ्यांनी तर सध्याच्या दरात खर्च निघणेही कठीण असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
आंतरराष्ट्रीय तणावाचाही परिणाम
व्यापारी वर्गाच्या माहितीनुसार, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांकडे होणारी केळी निर्यात सध्या ठप्प झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी मोठ्या प्रमाणावर दुबई, सौदी अरेबिया, इराण, इराक यांसारख्या देशांत निर्यात केली जाते. सध्या निर्यातीचे व्यवहार मंदावल्याने स्थानिक बाजारपेठांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.
निर्यात थांबल्याने माल देशांतर्गत बाजारात वळवला जात असून, त्याचा थेट परिणाम दरांवर होत आहे. जळगाव जिल्हा राज्यातील सर्वात मोठा केळी उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून केळी दरातील प्रचंड चढउतार हा कायमस्वरूपी प्रश्न बनला आहे. एखाद्या कालावधीत दर वाढले की लगेच निर्यात अडथळे, बाजारातील मंदी किंवा अन्य कारणे पुढे येतात आणि दर कोसळतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन वारंवार कोलमडते.
रमजानमुळे स्थानिक मागणीला आधार
सध्या मुस्लीम बांधवांचा रमजान महिना सुरू असल्याने स्थानिक बाजारात केळीला तुलनेने चांगली मागणी आहे. इफ्तारसाठी केळीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने किरकोळ बाजारात काही प्रमाणात दर टिकून आहेत. त्यामुळे दर आणखी खाली जाण्यापासून काहीसा अडथळा निर्माण झाला आहे. अन्यथा व्यापाऱ्यांकडून दर आणखी कमी करण्याचे प्रयत्न झाले असते, अशीही चर्चा शेतकरी वर्तुळात आहे. दरातील सातत्यपूर्ण अस्थिरतेमुळे केळी उत्पादकांकडून स्थिर व हमीभावाच्या धोरणाची मागणी पुन्हा एकदा पुढे येत आहे.
निर्यातीसाठी पर्यायी बाजारपेठांचा शोध, साठवणूक सुविधा, प्रक्रिया उद्योगांना चालना आणि थेट खरेदी यांसारख्या उपाय योजनांची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एकूणच, उत्पादन मर्यादित असतानाही निर्यात ठप्प आणि बाजारातील अनिश्चितता या दुहेरी संकटामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक अडचणीत आले आहेत. येत्या काही दिवसांत दरात सुधारणा होईल का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
