जळगाव : आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातून उत्तर भारत तसेच गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी तीन साप्ताहिक उत्सव विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. हजूर साहिब नांदेड–हजरत निजामुद्दीन, जालना–छपरा आणि हजूर साहिब नांदेड–उधना या तीन मार्गांवर या विशेष गाड्या धावणार असून, त्याद्वारे एकूण ३८ फेऱ्या उपलब्ध होणार आहेत. उत्सवाच्या काळात नियमित गाड्यांवरील वाढता प्रवासी भार कमी करण्यासोबतच प्रवाशांना अतिरिक्त रेल्वे सुविधा उपलब्ध करून देणे या विशेष गाड्यांचा उद्देश आहे.

नांदेड–हजरत निजामुद्दीन विशेष (१४ फेऱ्या)

गाडी क्रमांक ०७६२१ हजूर साहिब नांदेड येथून १७ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत दर शनिवारी सकाळी ८.४५ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचेल. या गाडीच्या सात फेऱ्या होणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०७६२२ हजरत निजामुद्दीन येथून १८ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत दर रविवारी रात्री ९.४० वाजता सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.३५ वाजता हजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल. या गाडीच्याही सात फेऱ्या होणार आहेत. या विशेष गाडीला जळगाव, भुसावळ येथे थांबे देण्यात आले आहेत. एक प्रथम एसी, एक एसी-२ टियर, चार एसी-३ टियर, सहा स्लीपर, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड ब्रेक वॅन आणि एक जनरेटर कार असे डबे असतील.

जालना–छपरा मार्गावर आठ विशेष फेऱ्या

उत्तर भारतातील प्रवाशांसाठी जालना–छपरा साप्ताहिक उत्सव विशेष गाडी क्रमांक ०७६५१ महत्त्वाची ठरणार आहे. ही गाडी ७, १४, २१ आणि २८ ऑक्टोबर रोजी दर बुधवारी रात्री ११.३५ वाजता जालना येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९.५० वाजता छपरा येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०७६५२ छपरा येथून ९, १६, २३ आणि ३० ऑक्टोबर रोजी दर शुक्रवारी रात्री ९ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९.५० वाजता जालना येथे पोहोचेल. या मार्गावर एकूण आठ फेऱ्या होणार आहेत. जालना–छपरा विशेष गाडीला जळगाव जिल्ह्यात भुसावळ येथे थांबा देण्यात आला आहे. दोन एसी-२ टियर, चार एसी-३ टियर, दहा स्लीपर, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड ब्रेक वॅन आणि एक जनरेटर कार असे डबे असतील.

नांदेड–उधना विशेष गाडीच्या १६ फेऱ्या

हजूर साहिब नांदेड आणि गुजरातमधील उधना दरम्यानही उत्सव विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०७६०५ हजूर साहिब नांदेड येथून ५ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत दर सोमवारी रात्री ११.१० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता उधना येथे पोहोचेल. या गाडीच्या आठ फेऱ्या असतील. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०७६०६ उधना येथून ६ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत दर मंगळवारी दुपारी ४.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४० वाजता हजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल. या गाडीच्या आठ फेऱ्या होणार आहेत. भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर, नंदुरबार थांबे देण्यात आले आहेत. एक प्रथम एसी, दोन एसी-२ टियर, सहा एसी-३ टियर, सहा स्लीपर, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन जनरेटर कार डबे असतील.

आरक्षणासाठी ऑनलाइन सुविधांचा वापर

उत्सवाच्या काळातील संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रवाशांनी विशेष गाड्यांचे आरक्षण वेळेत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तिकीट आरक्षणासाठी प्रवासी ‘रेलवन’ ॲपचा वापर करू शकतात.विशेष गाड्यांच्या विविध स्थानकांवरील आगमन व प्रस्थानाच्या सविस्तर वेळा जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या एनटीईएस सुविधेचा वापर करावा. यासाठी रेल्वेच्या चौकशी संकेतस्थळाला भेट देता येईल किंवा ॲपचा वापर करता येईल.