जळगाव : शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारे प्रकरण समोर आले असून, महापालिका निवडणूक आणि विविध शासकीय कामांमध्ये लाभ मिळवण्यासाठी बनावट जन्म दाखले सादर केल्याचा गंभीर आरोप भाजप नगरसेवक जाकीर खान रसूल खान यांच्यावर करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी महापालिका आयुक्त तसेच शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे.

कुलभूषण पाटील यांच्या तक्रारीनुसार, नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० ‘ड’ मधून जाकीर खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणूक प्रक्रियेनुसार सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्याला एकूण तीन अपत्ये असल्याचे नमूद केले होते. मात्र, कुलभूषण पाटील यांनी महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंद विभागातून अधिकृत माहिती मागविल्यानंतर संबंधित नोंदींमध्ये विसंगती आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.

महापालिकेच्या कागदपत्रांनुसार जाकीर खान यांना प्रत्यक्षात पाच अपत्ये असल्याचे दिसून येत असल्याचे पाटील यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे निवडणूक अर्जात अपत्यांची खरी संख्या लपवून खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जन्म-मृत्यू विभागाची दिशाभूल करून बनावट किंवा चुकीच्या नोंदींच्या आधारे दाखले मिळवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

सगळेच संशयास्पद…

माजी उपमहापौर पाटील यांच्याकडून तक्रारीत सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे जाकीर खान यांच्या दोन मुलींच्या जन्म तारखांमधील केवळ १५ दिवसांचे अंतर. उपलब्ध नोंदींनुसार पहिल्या अपत्याचा जन्म दिनांक ०२/०९/२००० असा असून त्याची नोंदणी १३/०९/२००० रोजी करण्यात आली आहे. दुसऱ्या अपत्याचा जन्म दिनांक १७/०९/२००० असा दाखवण्यात आला असून, त्याची नोंदणी १४/०८/२००७ रोजी झाल्याची नोंद आहे. वैद्यकीयदृष्ट्या केवळ १५ दिवसांच्या अंतराने दोन स्वतंत्र अपत्यांचा जन्म होणे अशक्य असल्याने या नोंदी संशयास्पद असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे दुसऱ्या अपत्याची नोंदणी जन्मानंतर सुमारे सात वर्षांनी करण्यात आल्याने त्या मागील कारणांबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. निवडणूक नियमांनुसार उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात अचूक व संपूर्ण माहिती देणे बंधनकारक असते. अपत्यांची संख्या लपविणे किंवा चुकीची माहिती देणे हा कायद्याचा भंग मानला जाऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाचा निवडणूक निकालावर किंवा सदस्यत्वावर काय परिणाम होऊ शकतो, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

प्रशासनाची भूमिका काय?

महापालिका प्रशासनाने प्राप्त तक्रारीची प्राथमिक पडताळणी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चौकशीत तथ्य आढळल्यास महापालिका प्रशासन स्वतः फसवणुकीची तक्रार दाखल करेल, असे संकेत देण्यात आले आहेत. तक्रारदार कुलभूषण पाटील यांनी महिनाभरात ठोस कारवाई न झाल्यास स्वतः पोलिसांकडे तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, या आरोपांबाबत जाकीर खान यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यांनी आरोप फेटाळले आहेत का किंवा यामागे राजकीय सूडबुद्धी आहे का, याबाबत स्पष्टीकरण येणे बाकी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर येईल का, आणि दोषींवर कारवाई होईल का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.