जळगाव : शहरातील शिवसेनच्या (उद्धव ठाकरे गट) दोन माजी महापौरांसह डझनभर माजी नगरसेवकांनी शुक्रवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याने भाजपची ताकद आता वाढली आहे. भाजपमध्ये प्रवेश करणारे सर्व दिग्गज हे माजी मंत्री सुरेश जैन यांचे कट्टर समर्थक असून, त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे प्रवेश घडून आलेले नाहीत, असे बोलले जात आहे.

एकेकाळी माजी मंत्री सुरेश जैन हे शिवसेनेशी संलग्न असतानाही त्यांच्या समर्थकांनी जळगाव शहरातील तत्कालीन नगरपालिका आणि नंतरच्या महापालिका निवडणुका या खान्देश विकास आघाडीच्या बॅनरखाली लढल्या. परिणामी, शिवसेनेला मुस्लीमबहुल तसेच इतर बिगरहिंदू मतदारसंघांमधूनही चांगले समर्थन मिळताना दिसून येत असे. महापालिकेवर सत्ता शिवसेनेची असली तरी, सर्व सूत्रे ही खान्देश विकास आघाडीच्या नावाखाली कार्यरत धुरिणांकडे असल्याचे चित्र दिसायचे. मात्र, या राजकीय समीकरणात गोंधळ निर्माण होत असल्याची जाणीव झाल्याने शिवसेनेच्या तत्कालीन नेतृत्वाने २०१८ च्या महापालिका निवडणुकीत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळची निवडणूक खान्देश विकास आघाडीच्या नव्हे, तर थेट शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर लढवण्याचे फर्मान काढले. मात्र, त्यामुळे बिगरहिंदू मतदारांचा पाठिंबा न मिळाल्याने शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही आणि केवळ १५ उमेदवार विजयी झाले. ज्यामुळे एकूणच शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेवर आणि आगामी निवडणुकांच्या समीकरणांवर दीर्घकालीन परिणाम झाले.

गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपने ५७ जागा जिंकून जळगाव महापालिका ताब्यात घेतली. सुरेश जैन स्वतः यांनी तेव्हापासून जळगावमधील लक्ष कमी केले. त्यांचे समर्थक नगरसेवक मात्र नंतरच्या काळात शिवसेनेच्या ठाकरे गटात स्थिरावले, परंतु, जैन यांच्यानंतर शिवसेनेत नव्याने उदयास आलेल्या सुनील महाजन यांच्यासारख्या तरूण नेतृत्वाने कालांतराने भाजपचेच काही नगरसेवक फोडून महापालिकेची सत्ता ताब्यात घेतली. ज्यामुळे भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि आमदार सुरेश भोळे यांना मोठा धक्का बसला. बहुमत असुनही भाजपवर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. त्याचाच हिशेब चुकता करण्याच्या निर्धारातून भाजपने सध्या ठाकरे गटात असलेल्या माजी मंत्री जैन यांचे समर्थक मानल्या जाणाऱ्या दोन माजी महापौरांसह जवळपास डझनभर नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश देण्याची खेळी खेळली आहे.

अर्थात, ठाकरे गटाचे सर्व दिग्गज हे काही गिरीश महाजन यांच्या एका शब्दावर भाजपमध्ये आलेले नाहीत. त्यासाठी मंत्री महाजन यांना माजी मंत्री सुरेश जैन यांची बरीच मनधरणी करावी लागल्याचे सांगितले जाते. जवळपास सहा महिन्यांपासून ठाकरे गटाचे दोन्ही महापौर, विरोधी पक्ष नेता आणि डझनभर माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत होती. प्रत्यक्षात, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही संबंधितांना मानाचे स्थान मिळेल की नाही, त्याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. दरम्यान, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सध्या फक्त चर्चा आहे. आमचे नेते सुरेश जैन यांच्याशी त्याबाबत अद्याप कोणतेच ठोस बोलणे झालेले नाही, असे वक्तव्य माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी केले होते. जैन सांगतील तेव्हाच काय ते पुढील हालचाली होतील, असा त्यांच्या वक्तव्याचा अर्थ होता. अखेर, जैन समर्थकांनी नेत्यांकडून हिरवा झेंडा मिळाल्यावर निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेशाचा अंतिम निर्णय घेतला आहे.