जळगाव : गेल्या तीन दशकांपासून जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या राजकीय आणि भावनिक आठवणींचे केंद्र म्हणून नावारुपाला आलेली बळीराम पेठेतील ‘वसंत स्मृती’ ही वास्तू आता केवळ आठवणीत राहिली आहे. शंभर वर्षांहून अधिक जुनी ही इमारत नव्या सुसज्ज कार्यालयाच्या उभारणीसाठी पाडण्यात आली आहे. त्याच जागेवर लवकरच नव्या जिल्हा कार्यालयाची इमारत उभारण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

जळगावात बळीराम पेठेतील बळीराम मंदिराजवळील चांदोरकरांच्या वाड्यात एका छोट्याशा खोलीतून तत्कालीन जनसंघाच्या कार्यालयाचा प्रवास सुरू झाला. १९८० पासून १९९० पर्यंत त्याच ठिकाणी भाजपचे कार्यालय सुरू राहिले. त्यानंतर १९९१ मध्ये डॉ. गुणवंराव सरोदे खासदार झाल्यानंतर तहसील कार्यालयासमोरील गल्लीत तीन खोल्यांच्या जागेत खासदारांचे संपर्क कार्यालय आणि भाजपचे जिल्हा कार्यालय सुरू झाले. सदरची जागा सुशीलाबाई गोडगस्ते यांनी विना मोबदला उपलब्ध करून दिली होती.

उत्तर महाराष्ट्राचे विभागीय कार्यालय

१९९४ मध्ये विनोद तावडे यांची उत्तर महाराष्ट्राचे पहिले विभाग संघटन मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर या कार्यालयाला उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालयाचे स्वरूप प्राप्त झाले. त्या काळात विनोद तावडे, डॉ. गुणवंराव सरोदे, एकनाथ खडसे, चंद्रकांत मेंडकी, नारायणराव चौधरी, गिरीश महाजन, डॉ. राजेंद्र फडके, ॲड. किशोर काळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तिथे नियमित उपस्थिती असायची.

वाजपेयी यांच्या गौरव निधीतून वसंत स्मृती

१९९५ नंतर भाजपचे जिल्ह्यातील संघटन विस्तारत असताना स्वतःच्या मालकीचे भव्य कार्यालय असावे, असा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी बळीराम पेठेतील पूर्वीच्या कोल्हटकरांच्या वाड्याची जागा पसंत करण्यात आली. त्याच काळात जळगावमध्ये झालेल्या भाजपच्या अधिवेशनासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी उपस्थित राहिले. त्यांच्यासाठी जिल्ह्यातून ५१ लाख रुपयांचा गौरव निधी संकलित करण्यात आला. मात्र, त्यांनी तो पक्षाला समर्पित केला. त्या निधीतून बळीराम पेठेतील पक्षाच्या कार्यालयाच्या इमारतीची डागडुजी आणि रंगरंगोटी करण्यात आली. स्व. वसंतराव भागवत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वास्तूला ‘वसंत स्मृती’ असे नाव देण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन अटलबिहारी वाजपेयी यांच्याच हस्ते झाले. त्यावेळी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नानासाहेब उत्तमराव पाटील आणि प्रा. ना. स. फरांदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अनेक राजकीय घडामोडींची साक्षीदार

गेल्या ३० वर्षांत पक्षाच्या बैठका, निवडणूक नियोजन, नेत्यांचे दौरे, उमेदवारांच्या मुलाखती आणि विविध संघटनात्मक घडामोडींचे वसंत स्मृती हे केंद्र राहिले. जिल्ह्यातील भाजपच्या राजकीय वाटचालीतील अनेक महत्त्वाच्या निर्णयांची साक्षीदार म्हणून कार्यकर्ते या वास्तूकडे पाहतात. त्यामुळे ‘वसंत स्मृती’शी अनेक कार्यकर्त्यांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. काळाच्या ओघात इमारत जीर्ण झाल्याने तिचे नूतनीकरण आवश्यक झाले होते. त्यामुळे जुनी वास्तू पाडून त्याच जागेवर सुसज्ज आणि भव्य नवीन भाजप कार्यालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जुन्या ‘वसंत स्मृती’ला निरोप देताना कार्यकर्त्यांमध्ये हुरहूर असली तरी त्याच नावाने नव्या वास्तूची उभारणी कधी होणार, याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे, असे भाजपचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्ते उदय भालेराव यांनी सांगितले.