जळगाव : जिल्ह्याच्या उत्तरेला नव्याने बऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. या महामार्गाला जळगाव शहराशी कमी अंतरात जोडणारा एक रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामामुळे आता पूर्णपणे चकाचक होत असून, त्यावरून हळूहळू वाहतूक सुरळीत होऊ लागली आहे. अनेक वर्षांपासून खराब असलेल्या रस्त्यामुळे त्रस्त वाहनधारकांना मोठा दिलासा मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यात दळणवळण सुविधांचा मोठा विस्तार होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडत असून, लवकरच तब्बल पाच राष्ट्रीय महामार्गांचे जाळे तयार होणार आहे. या महामार्गांमुळे रस्ते वाहतुकीची पायाभूत रचना अधिक मजबूत होणार असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळणार आहे. विशेषतः बऱ्हाणपूर–अंकलेश्वर (एनएच ७५३ बी) हा राष्ट्रीय महामार्ग उत्तर महाराष्ट्राच्या दळणवळणाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार असल्याचे चित्र आहे.

बऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग हा मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरपासून गुजरातमधील औद्योगिक शहर अंकलेश्वरपर्यंत प्रस्तावित असून, या महामार्गाद्वारे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात ही तीन राज्ये थेट जोडली जाणार आहेत. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर केवळ राज्यांमधील अंतरच कमी होणार नाही, तर व्यापार तसेच वाहतूक आणि प्रवास अधिक सुलभ व वेगवान होणार आहे.

जळगावहून थेट बऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी ममुराबाद, विदगाव, डांभूर्णीमार्गे किनगाव रस्ता एक महत्त्वाचा शॉर्टकट मानला जातो. या मार्गामुळे जळगाव शहरातील अंतर्गत वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होत असतो. अवजड वाहनांसह बसेस तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांसाठीही तो अत्यंत उपयोगी ठरतो. मात्र, मागील काही वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने मोठमोठे खड्डे आणि पावसाळ्यात साचणारे पाणी तसेच धुळीमुळे वाहनचालकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित यंत्रणेमार्फत किनगाव रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम काही महिन्यांपासून हाती घेण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने सुरू असलेले हे काम आता हळूहळू पूर्णत्वास येत असून, रस्त्याचा मोठा भाग नव्याने काँक्रिटचा तयार करण्यात आला आहे.

सुमारे ९९ कोटींचा निधी मंजूर

बऱ्हाणपूर–अंकलेश्वर महामार्गामुळे उत्तर महाराष्ट्राचा दळणवळण नकाशाच बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या ज्या भागांतून राष्ट्रीय महामार्गांचा थेट संपर्क नाही, त्या ग्रामीण व निमशहरी परिसरांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. विशेषतः शेतकरी वर्गासाठी हा महामार्ग अत्यंत फायदेशीर ठरणार असून, शेतमाल थेट मोठ्या बाजारपेठांपर्यंत जलदगतीने पोहोचवणे शक्य होणार आहे. या महामार्गाला जोडणाऱ्या जळगाव ते किनगाव २४ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम सध्या जोमाने सुरू असून, त्यामुळे जळगाव शहरातून बऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर जाणे अधिक सोपे आणि वेळेची बचत करणारे ठरणार आहे. सदर रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून वेगाने सुरू असून, त्यासाठी सुमारे ९९ कोटी रूपयांचा निधी मंजूर आहे. हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत केल्या जाणाऱ्या या रस्त्यामुळे सुरत-नागपूर-पारादीप आणि बऱ्हाणपूर-अंकलेश्वर हे दोन्ही महामार्ग एकमेकांशी कमी अंतरात जोडले जाणार आहेत. त्यामुळे जळगाव शहरातून बऱ्हाणपूर किंवा अंकलेश्वर जाणे सोयीचे ठरणार आहे.