जळगाव : शहराबाहेरील सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बायपासचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याने सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीतील तात्पुरत्या बदलास आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार, ६ ऑगस्ट रोजी पहाटे १२.०१ वाजल्यापासून १२ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बायपासवरील वाहतूक बंद ठेवून सर्व वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जारी केले आहेत.
३० आणि ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शहराबाहेरील सुरत–नागपूर बायपासवरील भुसावळकडून आसोदाकडे जाणाऱ्या रेल्वे पुलावरील रस्ता तसेच पाळधीकडून भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वे पुलावरील रस्ता मोठ्या प्रमाणात खचला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (न्हाई) मार्फत तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. सुरुवातीला १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या कालावधीत वाहतूक वळविण्यात आली होती.
दरम्यान, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या जळगाव प्रकल्प कार्यालयाने पोलीस प्रशासनाला पाठविलेल्या पत्रात दुरुस्तीचे काम अद्याप सुरू असून धुळेकडून नागपूरकडे जाणारा एकेरी मार्ग १२ ऑगस्टपर्यंत सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी विद्यमान डायव्हर्शनला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३३ (१) (बी) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. अपघात टाळणे, वाहतुकीचे नियमन करणे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने नागरिक, वाहनचालक तसेच अवजड वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत बायपासवरील संबंधित मार्गावरून वाहतूक करण्याचे टाळावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पर्यायी वाहतूक मार्ग असे राहतील
● भुसावळ/नागपूरकडून धुळे, सुरत/मुंबईकडे जाणारी वाहने :
भुसावळ – तरसोद फाटा – कालिंका माता मंदिर – अजिंठा चौफुली – आकाशवाणी चौक – शिव कॉलनी – बांभोरी पूल – पाळधी – धुळे.
● सुरत/धुळेकडून भुसावळ/नागपूरकडे जाणारी वाहने :
पाळधी – बांभोरी – शिव कॉलनी – आकाशवाणी चौक – अजिंठा चौफुली – कालिंका माता मंदिर – तरसोद फाटा – भुसावळ.
● छत्रपती संभाजीनगरकडून नागपूरकडे जाणारी वाहने :
संभाजीनगर – पहूर – जामनेर – नाहाटा चौफुली – भुसावळ – नागपूर.
● नागपूरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने :
नागपूर – भुसावळ – नाहाटा चौफुली – जामनेर – पहूर – छत्रपती संभाजीनगर.
● इंदूर/बडोदा/नंदुरबारकडून भुसावळ/नागपूरकडे जाणारी वाहने : चोपडा – अडावद – यावल – भुसावळ – नागपूर.
● नागपूर/भुसावळकडून नंदुरबार/बडोदा/इंदूरकडे जाणारी वाहने : भुसावळ – यावल – अडावद – चोपडा.
