जळगाव : शहरातून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे द्रुतगती महामार्गात रुपांतर करण्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. तत्पूर्वीच अजिंठा घाटातील वाहतूक कोंडी कायमची दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) सहा किलोमीटर लांबीचा नवा पर्यायी मार्ग उभारणीच्या हालचाली सुरु केल्याची माहिती मिळाली आहे. डोंगराला वळसा घालून नवा स्वतंत्र मार्ग तयार केला जाईल. यामुळे घाटातील धोकादायक वळणांसह तीव्र चढ-उतार आणि वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

जळगाव–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग हा राज्यातील वर्दळीच्या मार्गांपैकी एक मानला जातो. धुळे, जळगाव, बुलढाण्यातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या मालवाहतूक आणि प्रवासी वाहनांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. अजिंठा घाटातील सध्याचा रस्ता अनेक ठिकाणी अरुंद असून त्यामध्ये अनेक धोकादायक वळणे आहेत. त्यामुळे अवजड वाहनांना घाट चढताना किंवा उतरताना तारेवरची कसरत करावी लागते. एका वाहनाचा वेग कमी झाला की संपूर्ण वाहतूक ठप्प होते. विशेषतः पावसाळ्यात दरड कोसळणे, रस्त्यावर धुके पसरणे आणि घसरडे वळण निर्माण होणे, यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते. महामार्ग विभागाच्या आकडेवारीनुसार, या मार्गावरून दररोज सुमारे १८ ते २० हजार लहान-मोठी वाहने प्रवास करतात. त्यामध्ये जवळपास ७ ते ८ हजार अवजड वाहने असतात. दरवर्षी वाहनसंख्येत ८ ते १० टक्क्यांनी वाढ होत आहे. पर्यटन हंगामात आणि सणासुदीच्या काळात तर वाहनसंख्या २५ हजारांच्या पुढेही जाते. त्यामुळे अजिंठा घाटात अनेकदा पाच ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात.

असा असेल नवीन महामार्ग

सध्या जळगावहून छत्रपती संभाजीनगर जाताना अजिंठा घाट पार करण्यासाठी सरासरी ३० ते ४५ मिनिटे लागत असली, तरी वाहतूक कोंडीच्या काळात हा वेळ एक ते दीड तासांपर्यंत वाढतो. नवीन पर्यायी मार्ग सुरू झाल्यानंतर घाट पार करण्याचा वेळ १० ते १२ मिनिटांवर येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रस्तावित नवीन मार्गासाठी आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. डोंगर उतारांवर संरक्षक जाळ्या, रिटेनिंग वॉल, काँक्रीट बंधारे आणि पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र ड्रेनेज यंत्रणा उभारली जाणार आहे. रस्त्यावर दोन स्वतंत्र लेन, आपत्कालीन थांबा व्यवस्था, रिफ्लेक्टर, प्रकाशयोजना आणि सीसीटीव्ही निरीक्षण प्रणाली बसविण्याची योजना आहे. काही भागात भूस्खलन टाळण्यासाठी विशेष सॉईल स्टॅबिलायझेशन तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. प्रस्तावित महामार्ग साधारणपणे सहा किलोमीटर लांबीचा असेल. नवीन चारपदरी महामार्गाने जळगावहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरु केली जाईल. तर जळगावकडे येणारी वाहने सध्याच्या जुन्या घाटातून वाहतूक सुरु ठेवतील.

पर्यटकांना दिलासा मिळणार

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन महामार्गासाठी भू-सर्वेक्षण, वाहतूक अभ्यास आणि अलाइनमेंट निश्चितीची प्रक्रिया पूर्ण केली असून, पर्यावरणीय परिणाम अहवाल तयार करण्यात आला आहे. कारण प्रस्तावित मार्गाचा काही भाग डोंगराळ आणि वनक्षेत्रालगत असल्याने वन व पर्यावरण विभागाच्या मंजुरीनंतरच अंतिम बांधकाम सुरू होणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अजिंठा घाटातील हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दररोज हजारो वाहनांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. नव्या मार्गामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे इंधन वाचू शकते. वाहतुकीचा वेग वाढल्याने औद्योगिक व प्रवासी मालवाहतूक सुलभ होईल. जळगाव, छत्रपती संभाजीनगर तसेच जालना जिल्ह्यातील व्यापाराला चालना मिळेल. अजिंठा लेणी हे जागतिक वारसा स्थळ असल्यामुळे या परिसरात दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक येतात. वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना अनेक तास घाटात अडकून राहावे लागत होते. नवीन मार्ग सुरू झाल्यानंतर पर्यटकांनाही मोठा दिलासा मिळू शकणार आहे.