जळगाव – शहर हद्दीबाहेर रहिवासी वस्त्यांसह शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, रुग्णालये आणि उद्योगांचे प्रस्थ वाढलेले असताना, २२ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महापालिकेकडून आतापर्यंत एकदाही हद्दवाढ करण्यात आलेली नाही. महापालिकेने आता हद्दवाढ करण्याची मानसिकता तयार केली असली, तरी निवडणुका झाल्यानंतरच त्यासाठी हालचाली सुरू होतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
२१ मार्च २००३ रोजी सुमारे ६४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या तत्कालीन जळगाव नगरपालिकेचे, त्यावेळची लोकसंख्या आणि नागरी विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ‘ड’ वर्ग महापालिकेत रूपांतर करण्यात आले होते. २२ वर्षांत जळगाव शहराने सर्वचदृष्ट्या झपाट्याने प्रगती केली असून, शहराची सीमा आणि नागरी गरजा अनेकपटीने वाढल्या आहेत.
शहराच्या मर्यादेपलीकडे असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील गावांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घरे बांधली असून, उद्योजकांनीही महामार्गालगतच्या परिसरात उद्योगधंदे सुरु करण्याकडे कल दर्शवला आहे. यामुळे महापालिका हद्दीबाहेरच्या भागात पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, स्वच्छतागृहे, गटार व्यवस्था अशा मूलभूत सुविधा नागरिकांना स्वतःच्या खर्चाने उभाराव्या लागत आहेत. अनेक भागांत आजही या सुविधांचा अभाव जाणवतो. दरम्यान, गुंठेवारी प्रकल्पांना चालना मिळाल्यामुळे अकृषिक जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. नियोजनाच्या अभावामुळे अनियंत्रित शहरीकरण झाल्यामुळे पर्यावरणीय, सामाजिक आणि नागरी व्यवस्थापनाचे प्रश्नही निर्माण झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर, जळगाव महापालिकेच्या हद्दीचा पुनर्विचार करून शहर विकास आराखड्यात आसपासच्या गावांचा समावेश करणे अत्यावश्यक ठरले आहे. त्यामुळे नव्याने विकसित होणाऱ्या वस्त्या, संस्था आणि उद्योगधंद्यांना महापालिकेच्या माध्यमातून आवश्यक त्या नागरी व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देता येतील. याशिवाय, कर वसुलीतून महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल. याअनुषंगाने, जळगाव शहरालगतच्या कुसुंबा, रायपूर, असोदा, ममुराबाद, आव्हाणे, मोहाडी, मन्यारखेडा, बांभोरी आदी गावांपर्यंत हद्द वाढविण्याचा विचार महापालिकेकडून केला जाण्याची शक्यता आहे. हद्दवाढ करायची झाल्यास संबंधित ग्रामपंचायतींचे नाहरकत पत्रही महापालिका प्रशासनाला घ्यावे लागणार आहे.
जळगाव शहराची हद्दवाढ प्रस्तावित असली, तरी त्यासंबंधीची हालचाल महापालिकेच्या आगामी निवडणुकीनंतरच होऊ शकेल. कारण, त्यासाठी बरीच मोठी प्रक्रिया आहे. – ज्ञानेश्वर ढेरे (आयुक्त, महापालिका, जळगाव).