जळगाव : जिल्ह्याला ‘केळीची राजधानी’ म्हणून मिळालेली ओळख अधिक बळकट करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, मूल्यवर्धन आणि निर्यातक्षम उत्पादन यांचा संगम आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. रावेर तालुक्यातील अटवाडे येथे एका प्रगतशील शेतकऱ्याच्या केळी बागेला भेट देत सखोल पाहणी केल्यानंतर त्यांनी केळी लागवडीपासून ते निर्यात प्रक्रियेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचा बारकाईने आढावा घेतला.

शेतकरी वरुण अग्रवाल यांच्या शेतात पोहोचताच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केळीची आधुनिक लागवड पद्धती आणि निर्यातभिमूख प्रक्रियेची माहिती घेतली. प्लास्टिक आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासह तण नियंत्रण आणि उत्पादन खर्चात बचत कशी होते, याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांकडून दाखवण्यात आले. गादीवाफा पद्धतीमुळे पाण्याचा निचरा सुलभ होऊन मुळांची वाढ चांगली होते. तसेच योग्य अंतरावर केळी लागवड केल्याने झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश व हवा मिळून उत्पादनाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

यावेळी ‘बड इंजेक्शन’ तंत्रज्ञानाबाबतही सविस्तर चर्चा झाली. या तंत्रामुळे रोपांची वाढ अधिक समतोल होते. आणि घडांची गुणवत्ता सुधारते, असे निरीक्षण नोंदवण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी या नवीन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असे सूचित केले. केळी घडांची शास्त्रोक्त पद्धतीने कापणी, त्यानंतरचे वर्गीकरण (ग्रेडिंग), धुलाई (वॉशिंग), केमिकल ट्रीटमेंट आणि पॅकिंग या सर्व टप्प्यांचे त्यांनी निरीक्षण केले. शेतातून थेट निर्यातक्षम दर्जाचे बॉक्स पॅकिंग होत असल्याने वेळेची बचत व गुणवत्तेचे संरक्षण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

निर्यातक्षम केळी उत्पादनावर भर

जागतिक बाजारपेठेत जळगावच्या केळीला अधिक चांगले स्थान मिळवून देण्यासाठी संपूर्ण मूल्य साखळी मजबूत करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. उत्पादन, प्रक्रिया, पॅकिंग, साठवणूक (कोल्ड स्टोरेज), वाहतूक आणि निर्यात या सर्व टप्प्यांमध्ये समन्वय असल्यास शेतकऱ्यांना बाजारपेठेत अधिक चांगला दर मिळू शकतो, असे ते म्हणाले. तसेच केळीपासून चिप्स, पावडर, पल्प, फायबर अशा विविध मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती करून शेतकरी उत्पन्न वाढवू शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांशी मुक्त संवाद साधला. शेतीतील अडचणी, बाजारपेठेतील चढ-उतार, मजुरीचा प्रश्न, पाणी व्यवस्थापन यावर चर्चा करण्यात आली. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून एकत्रित शेती व प्रक्रिया उद्योग उभारल्यास खर्चात बचत होऊन नफा वाढू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रशासनाचे सहकार्य, पुढील दिशा

“तंत्रज्ञानाचा वापर, गुणवत्ता नियंत्रण आणि मूल्यवर्धन, या त्रिसूत्रीवर भर दिल्यास जळगावची केळी जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक ठरेल. रावेरमधील शेतकऱ्यांनी अवलंबलेली आधुनिक पद्धत संपूर्ण जिल्ह्यासाठी मार्गदर्शक आहे. जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, तसेच आवश्यक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून निर्यातक्षम शेतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी घुगे यांनी स्पष्ट केले.