जळगाव : जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या सुमारे ७३ वर्ष जुन्या काँग्रेस भवनाच्या ऐतिहासिक वास्तूच्या जागी अत्याधुनिक तीन ते चार मजली नवीन इमारत उभारण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. त्यास महाराष्ट्रातील ‘पथदर्शी’ प्रकल्प म्हणून वरिष्ठ पातळीवरून तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. नवीन इमारतीचे भूमिपूजन खासदार राहुल गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले काँग्रेस भवन हे केवळ पक्षाचे कार्यालय नसून जिल्ह्याच्या राजकीय इतिहासाशी जोडलेली एक महत्त्वाची वास्तू मानली जाते. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी या भवनाला भेट दिली होती. याशिवाय काँग्रेस पक्षातील अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय दिग्गज नेत्यांच्या बैठका, राजकीय रणनीती आणि ऐतिहासिक निर्णयांचे साक्षीदार म्हणून या भवनाकडे पाहिले जाते. अनेक ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या आठवणी या वास्तूशी जोडलेल्या आहेत. कालौघात या इमारतीची जीर्ण अवस्था झाली असून, काही भाग कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नवीन आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रदीप पवार यांनी स्पष्ट केले.
१० हजार चौरस फुटावर नवी इमारत
प्राथमिक वास्तूरचना तयार करण्यात आली असून, वरिष्ठ पातळीवरून डिझाइनला मंजुरी मिळाल्यानंतर जळगाव महापालिकेकडे अंतिम आराखडा मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. सुमारे १० हजार चौरस फुट जागेत उभारण्यात येणाऱ्या या नव्या इमारतीत पक्षाच्या प्रशासकीय कार्यालयांसह बैठकींसाठी आधुनिक सभागृह, कार्यकर्त्यांसाठी सुविधा, प्रशिक्षण केंद्र तसेच डिजिटल कार्यालय व्यवस्था निर्माण केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाच्या निधीतून ही नवीन इमारत उभारण्यात येणार असून, पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठी हा प्रकल्प आदर्श ठरेल, या दृष्टीने ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. जळगाव काँग्रेस भवनाच्या नव्या उभारणीमुळे पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक सक्षम होईल. तसेच नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होतील, असेही जिल्हाध्यक्ष पवार यांनी नमूद केले.
काँग्रेसच्या विविध शहरांत मालमत्ता
गेल्या तीन वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या मिळकती, मालमत्ता आणि जागांच्या शोधासाठी सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाल्याचेही जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात विविध शहरांमध्ये काँग्रेस पक्षाच्या मालकीच्या जागा असल्याची माहिती त्यांनी दिली. रावेर शहरात काँग्रेसकडे सुमारे ६० हजार चौरस फुट जागा असून, चाळीसगाव शहरात १८०० ते १९०० चौरस फुट जागा आहे. अमळनेर येथे २३०० चौरस फुट जागा असून, एरंडोलमध्येही पक्षाची मालमत्ता असल्याचे त्यांनी सांगितले. या मालमत्तांचा भविष्यात संघटनात्मक आणि विकासात्मक कामांसाठी उपयोग केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काँग्रेस भवनाचा राजकीय आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. जिल्हाभरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडील जुन्या छायाचित्रांचे संकलन करण्यात येणार असून, काँग्रेस भवनाच्या इतिहासावर आधारित स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. या स्मरणिकेत भवनाशी निगडित ऐतिहासिक घटना, नेत्यांच्या भेटी, निवडणूक प्रचार, आंदोलने आणि पक्षाच्या विविध टप्प्यांचा आढावा घेतला जाणार आहे.
