जळगाव : यंदाच्या खरीपात प्रारंभी पावसाचा विलंब आणि नंतर अतिवृष्टीमुळे कपाशी पिकाचे क्षेत्र लक्षणीय घटले आहे. त्यात उरलेल्या पिकाला आता पाऊस गायब झाल्याचा फटका बसला असून पात्या आणि बोंडधारणेच्या अवस्थेतील कपाशीवर लाल्या रोगाचे संकट ओढवले आहे. प्रतिकूल हवामानामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढल्याच्या स्थितीत कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

यंदाच्या खरीप हंगामात विविध कारणांनी राज्यातील कपाशीचे क्षेत्र सरासरीच्या तुलनेत सुमारे साडेचार लाख हेक्टरने घटले आहे. जळगाव जिल्ह्यातही सरसरीच्या सुमारे सव्वालाख हेक्टरने लागवड कमी झाली आहे. त्यातच जुलैअखेर झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ३५ हजार हेक्टरवरील कपाशीचे नुकसान झाले. त्यामुळे उरलेल्या पिकातून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकरी बाळगून असताना पावसाचा खंड पडल्याने आता लाल्या रोगाच्या संकटाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. सध्या कपाशीचे पीक पात्या लागण्यापासून बोंडे परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. याचवेळी झाडांना पाणी मिळत नसल्याने लाल्या, नैसर्गिक गळ, आकस्मिक मर, दहिया, करपा यांसारख्या समस्या तसेच रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. लाल्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पीक लागवडी झाल्यापासून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचा सल्ला जळगाव येथील कापूस संशोधन केंद्राने दिला आहे. पाण्याची उपलब्धता कमी असल्यास एक सरी आड पाणी द्यावे, अशी सूचना कापूस संशोधन केंद्राने केली आहे.

‘लाल्या हा रोग नसून एक विकृती’

कपाशीवरील ‘लाल्या हा रोग नसून एक विकृती’ असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगतात. कापूस पिकामध्ये विशेषतः अमेरिकन संकरित बीटी वाणांमध्ये ही विकृती मोठ्या प्रमाणावर दिसून येते. पानांच्या कडा किंवा संपूर्ण पान लालसर, जांभळट किंवा तांबूस होणे, पाने आकसणे आणि पिकाची वाढ मंदावणे अशी लक्षणे प्रामुख्याने दिसतात. पिकाला पाण्याचा जास्त ताण पडणे, त्यानंतर अचानक पाणी मिळणे, तापमानात होणारे मोठे चढ-उतार तसेच रसशोषक किडींचा प्रादुर्भाव यामुळे लाल्याची समस्या वाढू शकते. त्याचबरोबर जमिनीत नत्र आणि मॅग्नेशियम यांसारख्या अन्नद्रव्यांची कमतरता किंवा असमतोल असल्यास पानांमध्ये आवश्यक जैविक प्रक्रिया बिघडून लालसरपणा दिसून येतो. त्यामुळे लाल्या दिसताच केवळ रोग समजून बुरशीनाशकांची फवारणी करण्याऐवजी पिकाची मुळांची स्थिती, जमिनीतील ओलावा, अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि रसशोषक किडींचा प्रादुर्भाव तपासणे महत्त्वाचे आहे. योग्य पाणी व्यवस्थापन, संतुलित खत व्यवस्थापन आणि किडींचे वेळेवर नियंत्रण केल्यास कापसावरील लाल्याची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते.

यंदाच्या हंगामातील समस्या :

  • राज्यात साडेचार लाख, तर जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सव्वालाख हेक्टरने कपाशीची लागवड घटली.
  • जुलैअखेर झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवरील कपाशी पिकाचे मोठे नुकसान.
  • सुरुवातीला अतिवृष्टी आणि आता पाऊस गायब झाल्याने पात्या व बोंडधारणेच्या अवस्थेत ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव.
  • पाण्याचा ताण पडल्यामुळे कपाशीवर नैसर्गिक गळ, आकस्मिक मर, दहिया, करपा आणि रसशोषक किडींचे प्रमाण वाढले.