जळगाव : बहिणीशी आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून शालकाने मेहुण्याला जंगलात नेऊन त्याच्या डोक्यात मोठा दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना अखेर खुनाच्या गुन्ह्यात परिवर्तित झाली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रशांत सुभाष चौधरी (२६, रा. फत्तेपूर, ता. जामनेर) याचा छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रशांत चौधरी याने काही महिन्यांपूर्वी वडगाव सद्दो येथील एका तरुणीशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. या विवाहाला तरुणीच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. विशेषतः तिचा भाऊ अभिषेक संतोष मोरे हा बहिणीच्या विवाहामुळे संतप्त होता. विवाहाचा राग मनात ठेवून त्याने मेहुणा प्रशांतचा काटा काढण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.
घटनेच्या दिवशी अभिषेकने प्रशांतला विश्वासात घेत गोड बोलून तोरणाळा जंगल परिसरात नेले. तेथे दोघांनी मद्यपान केले. त्यानंतर संधी साधून अभिषेकने जवळील मोठा दगड उचलून प्रशांतच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात प्रशांत गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. तो मृत झाल्याचा समज करून संशयिताने त्याला जंगलातील एका खड्ड्यात फेकून दिले. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याच्या अंगावर झाडांची पाने व फांद्या टाकून तो घटनास्थळावरून पसार झाला.
उपचार सुरू असतानाच मृत्यू
दरम्यान, प्रशांत रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. मात्र त्याचा कोणताही मागमूस न लागल्याने त्याची आई सरला चौधरी यांनी संबंधित पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. तपासादरम्यान तोरणाळा जंगल परिसरात प्रशांत अर्धमृत अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्याची प्रकृती सुधारली नाही. अखेर शुक्रवारी उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
खुनाचे वाढीव कलम लागू होणार
प्रशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुरुवातीला या प्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र शालकाच्या हल्ल्यात जखमीचा मृत्यू झाल्याने आता या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाचे संबंधित वाढीव कलम समाविष्ट करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संशयिताविरुद्ध अधिक कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
