जळगाव : जिल्ह्यातील अकुलखेडा (ता. चोपडा) येथे प्रियकराने विवाहितेची तिच्या राहत्या घरी गावठी बंदुकीतून गोळी घालून हत्या केल्यानंतर स्वतःही जीवन संपविल्याची खळबळजनक घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून, पुढील तपासाला गती देण्यात आली आहे.

अनिता जगदीश पाटील (४०) आणि देवा धनगर (४०) यांच्यात समाज माध्यमावर ओळख निर्माण होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनिता ही देवा धनगर यास वेळ देत नसल्याने तो संतप्त झाला होता. रागाच्या भरात देवा शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अकुलखेडा येथे अनिताच्या घरी कोणीही नसताना गेला. यावेळी दोघांमध्ये टोकाचे वाद देखील झाले. आणि देवाने गावठी बंदुकीने अनिताच्या डोक्यात गावठी बंदुकीतून गोळी झाडली. अनिता रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जगदीश पाटील यांची मुलगी शाळेतून घरी परतल्यानंतर तिने घरात दोघांचेही मृतदेह पाहिले.

घाबरलेल्या मुलीने जोरात आरडाओरडा करून शेजारील रहिवाशांना घटनेची माहिती दिली. तिचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक तत्काळ बाहेर आले आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. घटनेची खबर मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप तसेच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळी देवा धनगर याची दुचाकीही आढळून आली असून, पोलिसांनी ती ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

किरकोळ वादातून तरुणाची हत्या

दुसऱ्या एका घटनेत यावल तालुक्यातील हिंगोणा येथे किरकोळ वादातून १९ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुणाचे नाव प्रथमेश मुकेश महाले (१९) असे असून, वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या प्रथमेशचा मृत्यू झाला. रीना मोहित गजरे  १९), मोहित राजेंद्र गजरे (३०) आणि निखिल राजेंद्र गजरे (२६) हे तिघेही चाकू हल्ल्यात जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील संशयित  गौरव जाधव (रा. खिर्डी, ता. रावेर, हल्ली रा. हिंगोणा) घटनेनंतर फरार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.