जळगाव : जिल्ह्यातील यावल तालुक्यात किनगाव येथे सुरुवातीला अपघात समजल्या गेलेल्या प्रकरणाला पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर गंभीर वळण मिळाले आहे. ७० टक्के दृष्टिदोष असलेल्या विवाहित महिलेला तिच्या साडेतीन वर्षीय अंध मुलासह शेतातील विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप असून, या घटनेत मुलाचा मृत्यू झाला आहे. तर महिलेने विहिरीतील लाकडी दांड्याचा आधार घेत कसातरी जीव वाचवला. या प्रकरणी महिलेचा अंध पती आणि सासूविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात खून व खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

१३ जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास किनगाव शिवारातील शेतात असलेल्या एका विहिरीत २७ वर्षीय महिला आणि तिचा साडेतीन वर्षीय मुलगा पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली, तर मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. जखमी महिलेवर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर असल्यामुळे तिने सुरुवातीला कोणताही जबाब दिला नव्हता. त्यामुळे ही घटना अपघाती असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर महिलेचा खुलासा

मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत महिलेची सखोल चौकशी केली. त्यावेळी तिने अतिशय धक्कादायक माहिती दिली. शेतातील विहिरीची पूजा करण्यासाठी गेल्यानंतर सासूने तिला आणि मुलाला मुद्दाम विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप तिने केला. या कटात पतीचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीनुसार, विहिरीत पडल्यावर तिने आत असलेल्या लाकडी फाउंडेशनचा आधार घेत जीव वाचवला. मात्र, तिचा साडेतीन वर्षीय मुलगा पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला.

कौटुंबिक वादातून गुन्हा?

पोलिस तपासानुसार, फिर्यादी महिला ७० टक्के दृष्टिदोष असलेली आहे, तर तिचा पती शंभर टक्के दृष्टिहीन आहे. मृत मुलगाही जन्मतःच दृष्टिहीन होता. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, गर्भावस्थेदरम्यान वैद्यकीय तपासणीत होणारे अपत्यही अंध असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर पतीने गर्भपात करण्याचा आग्रह धरला होता. मात्र, महिलेने त्यास नकार देऊन मुलाला जन्म दिला. यानंतर दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. या कारणामुळेच हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या दृष्टीने तपास सुरू आहे. या प्रकरणी फिर्यादी सरस्वती स्वप्नील पाटील (२७, रा. किनगाव, यावल) यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात पती स्वप्नील भागवत पाटील (३४) आणि सासू आशाबाई भागवत पाटील (६०) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३ (१), १०९ (१) आणि ३ (५) अंतर्गत खून व खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना यावल पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.